पुणे - कोरोना महामारी आणि चक्रीवादळ अशा दुहेरी संकटात सापडल्यामुळे शेतकरी पुरता हतबल झाला आहे. मात्र, मान्सूनच्या सरी बरसताच हाच कष्टकरी बळीराजा खरीपाच्या तयारीला लागला आहे. जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर तालुक्यात पेरणीला सुरुवात झालेली आहे.
ना पीककर्ज, ना शेतमालाची विक्री; मात्र, बळीराजा काळी माती कसण्यासाठी तयार
कोरोना आला आणि बाजारभावाअभावी शेतकऱ्यांचा शेतमाल शेतातच सडला. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला. त्यानंतर निसर्ग चक्रीवादळाने देखील शेतकऱ्यांचे नुकसान केले. आधीच्या हंगमामधील पीक हाती न लागल्याने शेतकऱ्यांजवळ पैसा उरलेला नाही. शेतकऱ्यांना वेळेवर पीककर्ज मिळाले नाही. त्यामुळे पेरणी कशी करायची? ही चिंता त्यांना सतावत आहे.
गेल्या वर्षीचा खरीप आणि हंगाम निसर्गाच्या लहरीपणामुळे वाया गेला. त्यामधूनही सावरत शेतकरी उभा राहीला. मात्र, कोरोना आला आणि बाजारभावाअभावी शेतकऱ्यांचा शेतमाल शेतातच सडला. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला. त्यानंतर निसर्ग चक्रीवादळाने देखील शेतकऱ्यांचे नुकसान केले. आधीच्या हंगमामधील पीक हाती न लागल्याने शेतकऱ्यांजवळ पैसा उरलेला नाही. तसेच शेतकऱ्यांना वेळेवर पीककर्ज मिळाले नाही. त्यामुळे पेरणी कशी करायची? ही चिंता त्यांना सतावत आहे. मात्र, इकडून तिकडून चार पैसे जमवून शेतकरी आपली काळी माती कसण्यासाठी तयार झाला आहे. पावसाच्या सरी बरसताच त्याने नांगरणी, पेरणीच्या कामाला सुरुवात केली आहे. खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यात सोयाबीन, भुईमुग, बाजरी, मका आणि कडधान्यांचे ६० हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर लागवड होत असून कृषी विभागाकडून खते, बियाणे दिले जात आहेत.