राजगुरूनगर (पुणे) - उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 25 ते 30 प्रकारच्या भाजीपाला व तरकारी मालाची खरेदी-विक्री होत असते. मात्र गेल्या वर्षभरापासून या बाजार समितीत शेतीमालाला कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने, शेतकरी हतबल झाला आहे. कोरोनानंतर परिस्थिती बदलून भाजीपाला व तरकारी मालाला बाजारभाव मिळेल अशी अपेक्षा असतानाही शेतमालाची विक्री कवडीमोल बाजारभावाने होत असल्याने, उत्पादन खर्च मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
उत्पादन खर्चही मिळेना
कोरोनाच्या लॉकडाउनमध्ये शेतमालाच्या बाजार भावात चढ-उतार होऊन काही प्रमाणात पैसे शेतकऱ्यांच्या हातात येत होते. मात्र कोरोनाच्या लॉकडाउननंतर भाजीपाला व तरकारी मालाची आवक वाढू लागल्याने बाजारात विक्रीला आलेला शेतमाल कवडीमोल किमतीने विक्री होऊ लागला आहे. त्यामुळे शेतात केलेली मेहनत, बी-बियाणे, औषध फवारणी व मजुरी असा उत्पादनखर्चही मिळत नसून, सोन्यासारखा पिकवलेला शेतमालाची कवडीमोल किमतीने शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर विक्री होत आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.