बारामती (पुणे) - ‘महा कृषी ऊर्जा अभियान’ अंतर्गत मिळणाऱ्या सवलतीचा फायदा घेत शेतीपंपाचे थकीत वीजबिल भरणाऱ्या बारामती परिमंडळातील 72 हजार 751 शेतकऱ्यांचे तब्बल 75 कोटी 48 लाख रुपये माफ झाले आहेत. सुधारित थकबाकीच्या 50 टक्के रक्कम भरल्यास उर्वरित थकबाकी माफ होत असून, वीजबिल कोरे झाल्याचे प्रमाणपत्रच शेतकऱ्यांना महावितरणतर्फे देण्यात येत असल्याने शेतकरी थकीत वीजबिल भरण्यासाठी पुढे येत आहेत.
बारामती परिमंडळातील 7 लाख 36 हजार 932 शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. यापैकी 72 हजार 751 शेतकऱ्यांनी आतापर्यंत या योजनेचा फायदा घेतला आहे. त्यांनी थकीत व चालू बिलापोटी मिळून 115 कोटींचा भरणा केला. त्यातील त्यांच्या थकबाकीच्या 50 टक्के रक्कम सुमारे 75 कोटी माफ झाली. यामध्ये बारामती मंडलातील 28 हजार 390, सातारा 29 हजार 816 व सोलापूर मंडलातील 14 हजार 545 शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यांनी अनुक्रमे 41.40 कोटी, 55.85 कोटी व 17.95 कोटी रुपये भरले आहेत. मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी परिमंडळात ‘एक गाव, एक दिवस’ सारखे उपक्रम गावांगावात राबविल्याने शेतकरी ग्राहकांच्या वीज समस्यांचा निपटारा झाला आहे. परिणाम स्वरुप शेतकऱ्यांनीही ‘माझे वीजबिल, माझी जबाबदारी’ म्हणत वीजबिल कोरे करण्याचा संकल्प केलेला आहे. उर्वरित शेतकऱ्यांनीही या योजनेचा लाभ घ्यावा, यासाठी महावितरण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांना या योजनेचे महत्व पटवून देत आहे.