पुणे - हाता तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिसकावल्याने राज्यभरातील शेतकरी हवालदील झाला आहे. काढणीला आलेले व काढलेले पीक परतीच्या पावसाने पुन्हा शेतातच भिजल्याने शेतकऱ्यांच्या काबाड कष्टासह त्यांचे पीक वाया गेले आहे. बारामती उपविभागातील बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर या भागातील ८२ हजार १२८ शेतकऱ्यांचे ४३ हजार ७३१ हेक्टर शेतीक्षेञ अवकाळी पावसाने बाधीत झाले आहे. सध्या पेरण्यांचा हंगाम सुरू आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे झाले. मात्र, अद्याप नुकसान भरपाई न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
राज्याच्या राजकारणांची समीकरणे कशी आणि केव्हा जुळून येतील. हे कळायला मार्ग नाही. मात्र, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आले आहेत. यंदाच्या या ओल्या दुष्काळाने शेतकऱ्यांच्या हाता तोंडांशी आलेला घास हिरावून घेतल्याची परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे. त्यातच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी मिळेल? याची हे माहिती नाही. त्यामुळे अन्नदात्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. राज्यातील अनेक भागात सततची नापिकी आणि ओल्या दुष्काळामुळे अडचणीत असलेल्या अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे.
अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त शेतीचा आढावा घेण्यासाठी आम्ही बारामती तालुक्यातील मळद गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीचा आढावा घेतला. ५ हजार ६२८ लोकसंख्या असलेल्या या गावातील ६० टक्के नागरिक शेती करतात. सोयाबीन, मका, कडवळ, ऊस, वांगी, भेंडी यासारखी पीके घेतली जातात. माञ, यावेळी पडलेल्या अवकाळी पावसाने राज्यासह येथील शेतकऱ्यांनाही अडचणीत टाकले आहे. या भागात शेतकऱ्यांनी घेतलेल्या ४० ते ५० एकरातील सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काढून ठेवलेले सोयाबीन पावसाने भिजून पुन्हा त्याला कोंब फुटले आहे. १० टक्के देखील सोयबीन पिकाचे उत्पादन होणार नाही. त्यामुळे झालेल्या नुकसानीची किमान ७५ टक्के मदत व्हावी, अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे.
मदत मिळणार कधी?
अवकाळी पावसामुळे राज्यभरात झालेल्या शेतमालाच्या नुकसानीनंतर मुख्यमंत्र्यांनी तात्पुरत्या स्वरुपात १० हजार कोटी रुपयांच्या तरतुदीची घोषणा केली. माञ, सद्यस्थितीत या तरतुदीच्या रकमेवर कोणतीही प्रक्रिया झाली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे १० हजार कोटी रुपयांच्या तरतुदीची केवळ घोषणाच ठरली आहे.