राजगुरुनगर(पुणे) - राज्यात मान्सूनचे आगमन होताच पेरण्यांना सुरुवात झाली. जवळपास ७० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. दुष्काळी संकट, अवकाळी पाऊस, चक्रीवादळ आणि कोरोनाची महामारी अशा संकटांचा सामना करत शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी केली. जिल्ह्यातील ग्रामीण भागात बहुतांशी शेतकऱ्यांनी महाबीजच्या सोयाबीनची पेरणी केली आहे. मात्र, पेरलेले सोयाबीन उगवलेच नसल्याने शेतकरी पुरता हतलब झाला आहे.
जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी केली जाते. पहिल्या पावसाच्या सरी सुरू झाल्या आणि शेतकरी खरिपाच्या तयारीला लागला. महाबीज कंपनीवरील विश्वासामुळे शेतकऱ्यांनी तेथून बियाणे खरेदी करून सोयाबीनची पेरणी केली. मात्र, पेरणी करूनही सोयाबीन उगवलेच नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. याप्रकरणी शासनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहे.