पुणे- ग्रामीण भागात कोरोनाच्या महामारीमुळे सार्वजनिक कार्यक्रम, लग्न समारंभ, मंदिर बंद असल्याने पॉलिहाऊसमध्ये तयार झालेला माल फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. त्यातच चक्रीवादळात शेतीसह पॉलिहाऊसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मोठ्या भांडवली खर्चातून उभारलेले पॉलिहाऊस आर्थिक संकटात सापडले आहेत. या संकटातूनही उभारी घेऊन खेड तालुक्यातील देवतोरणे गावातील उषा आवारी या महिलेने कर्जाचा डोंगर डोक्यावर घेऊन पुन्हा उभारी घेतली आहे.
खेड तालुक्यातील देवतोरणे गावातील उषा आवारी या महिलेने 29 गुंठे शेतावर 35 लाख रुपये कर्ज काढून लाल-पिवळ्या व गुलाबी रंगाच्या गुलाबाच्या फुलांची शेती करण्यासाठी पॉलिहाऊस उभारले. उषाने घरातीलच नातेवाईकांच्या मदतीने पॉलिहाऊसची उभारणी केली. दिवस-रात्र मेहनत करून उभारलेले पॉलिहाऊस कोरोनाच्या महामारीच्या संकटात सापडले. त्यातच वातावरणातील बदलामुळे फुलांना रोगराईने ग्रासले. अशा संकटाचा सामना करत असताना चक्रीवादळाने संपूर्ण पॉलिहाऊस उद्ध्वस्त झाले. अशा संकटाच्या विवंचनेत असताना नातेवाईक मित्रमंडळी यांच्या मदतीने पैशाची उभारणी केली. पुन्हा नव्याने खचून न जाता पॉलिहाऊस उभे केले आहे.