पुणे- राज्य सरकारने 2015-16 ते 2019-20 या कालावधीत केवळ दूरचित्रवाणी व रेडिओवरील जाहिरातींसाठी 15 कोटी 28 लाख रुपये खर्च केला आहे. यामध्ये नोव्हेंबर 2019 नंतरचा काळ वगळला, तर हा सर्व खर्च भाजप सरकारच्या काळातील आहे. दररोज सरासरी 85 हजार रुपयांचा खर्च जाहिरातींवर झाल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे.
अबब...फडणवीस सरकारचा जाहिरातींवरचा खर्च जाणून व्हाल थक्क! - नितीन यादव
राज्यात फडणवीस सरकारच्या कार्यकाळात वृत्तपत्र जाहिरात वगळता फक्त टीव्ही आणि रेडिओ वाहिन्यांवर जाहिरातींसाठी गेल्या पाच वर्षांत तब्बल 15 कोटी 28 लाख रूपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे.
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील नितीन यादव यांनी ही माहिती मागवली होती. यात काही तपशील उघडकीस आले आहेत. फडणवीस सरकारने 2017-18 साली टीव्ही वाहिन्यांवरील जाहिरातींवर तब्बल 5 कोटी 99 लाख 97 हजार 520 रुपये खर्च केले असल्याची माहिती मिळाली आहे, तर याच वर्षी रेडिओ जाहिरातींवर 1 कोटी 20 लाख 69 हजार 877 रुपयांचा खर्च केला आहे.
फडणवीस सरकारच्या काळात रेडिओ वाहिन्यांवर जाहिरातीवर केलेला खर्च 2013-2014 साली 59 लाख 96 हजार 291 रुपये इतका होता. तो वाढून 2018-2019 साली 1 कोटी 85 लाख 72 हजार 887 झाल्याचे दिसत आहे, तर टीव्ही वाहिन्यांवर जाहिरातीसाठी केलेला खर्च 2013-2014 साली 53 लाख 25 हजार 730 रुपये होता, तो 2018-2019 साली वाढून तब्बल 2 कोटी 84 लाख 48 हजार 317 रुपये झाल्याची माहिती या माहिती अधिकारातून मिळाली आहे.