पुणे- वातावरणातील बदलामुळे एका दिवसातच तीन ऋतूंचा अनुभव घ्यावा लागतो. नोव्हेंबर महिन्यापासून हे बदल सातत्याने घडत असल्यामुळे उसाला तुरे येण्यास सुरूवात झाली. त्यामुळे उसाची उत्पादकता कमी होत आहे.
प्रतिक्रिया देताना कृषी तज्ञ विश्वनाथ डोळस हवेत आर्द्रतेचे प्रमाण 65 ते 90 टक्के असावे लागते. सध्या वातावरणातील अनिश्चिततेमुळे राज्यात जवळपास सगळीकडेच उसाला तुरे येण्याचे प्रमाण वाढले आहे. उसाच्या उत्पादनात यामुळे घट होण्याची भीती व्यक्त होत आहे.
बदलत्या हवामानामुळे उत्पादनामध्ये सर्वसाधारण 15 ते 20 टक्के घट होण्याची शक्यता असते. उसाचा तुरा बाहेर येण्यास १८ महिन्यांचा कालावधी आवश्यक असतो. मात्र, वातावरणातील बदलामुळे हा तुरा निश्चित कालावधीच्या आधीच आल्याने आल्याने उसाची वाढ खुंटते. तुरा आलेला ऊस दीड ते दोन महिन्यांच्या पुढे राहिला तर तो पोकळ होतो. त्यानंतर एक ते दीड महिन्यात उसाची तोडणी करणे गरजेचे असते. कारण तुरे आल्यानंतर उसाचे वजन कमी होते. परिणामी उसाच्या सरासरी उत्पादनात घट होण्याची चिन्हे निर्माण होतात.
यावर काय उपाय करावा?
सध्याच्या परिस्थितीत उसाच्या प्रत्येक जातीला तुरे येण्याची शक्यता असते. मात्र, यावर उपाययोजना म्हणून ०:५२:३४ व ०:०:५० या खतांचा २५-७५ या प्रमाणात वापर करावा. पाण्याचे प्रमाणही नियंत्रित करावे. खतांच्या वापरामुळे उसाची फुगवण क्षमता वाढते. परिणामी उसाचे वजनही वाढण्यास मदत होते. याचा अपेक्षित परिणाम उसाच्या उत्पादनावर होऊन अशा परिस्थितीतही निश्चित उत्पादन वाढते, असे तज्ञांचे मत आहे.