पुणे:तत्कालीन संचालकांनीशिवाजीराव भोसले बँकेतील ठेवीदारांची 71 कोटी रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी पुणे शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयाने माजी आमदार अनिल भोसले यांच्या मालमत्तेवर टाच आणली होती. आता ईडीनेही अनिल भोसले यांची पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील मिळून 26 कोटी 60 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या प्रकरणामध्ये अनिल भोसले यांना मागील वर्षी मार्च महिन्यात अटक झाली होती.
पुण्यातील शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील माजी आमदार अनिल भोसले यांच्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे.तर गैरव्यवहार प्रकरणात बँकेचे संचालक भोसले यांच्यासह सूर्याजी पांडुरंग जाधव, नूसर शनूर मुजावर यांच्यासह अन्य आरोपींवर यापुर्वीच गुन्हा दाखल झालेला आहे. माजी आमदार अनिल भोसले हे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे विधान परिषदेचे सदस्य होते.राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचे ते निकटवर्तीय होते.पण 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत अनिल भोसले आणि अजित पवारांमध्ये पत्नी रेश्मा भोसले यांना तिकीट देण्यावरून वाद झाला होता. त्यानंतर अनिल भोसले यांनी त्यावेळी भारतीय जनता पक्षाशी जवळीक करत राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आणि भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु काही महिने भाजपमध्ये राहून त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.
पिंपरी चिंचवडमधील सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष अमर मूलचंदानी यांच्यावर ईडीने छापेमारी केल्याचे प्रकरण ताजे आहे. यातच आता ही कारवाई झाली आहे. बॅंकेत असलेल्या 71 कोटी रुपयांच्या अपहाराचे हे प्रकरण आहे. अंमलबजावणी संचालय म्हणजे ईडी ने या प्रकरणात कारवाई करत माजी आमदारांची मालमत्ता जप्त केली आहे. या प्रकरणी त्यांना मागील वर्षी मार्च महिन्यात अटक झाली होती. बँक गैरव्यवहार प्रकरणात इतर संचालकांसह अन्य आरोपींवरही यापुर्वीच गुन्हा दाखल झालेला आहे.