पुणे: जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज खासदार गिरीश बापट यांच्या घरच्यांची भेट घेतली. यावेळी ते बोलत होते. काल छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर तसेच पाटील यांच्यावर देखील टीका केली आहे. त्यावर पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, एका गिरणी कामगाराचा मुलाचा उल्लेख होतो हे अतिशय चांगले आहे. पण वाईट फक्त याचाच वाटत आहे की, झोपेचे सोंग घेतलेल्या व्यक्तीला उठवता येत नाही. माझ्या ज्या ज्या वाक्यांची वादग्रस्त चर्चा करण्यात आली आहे. त्या सर्व वाक्याची उद्धव जी एकदा व्हिडिओ लावुया आणि त्यात काय चुकलं काय बरोबर आहे बघुया. प्रत्येकाला आपल्या अस्तित्वाची लढाई लढावी लागते. महा विकास आघाडीला देखील त्यांच्या अस्तिवाची लढाई सुरू आहे; म्हणूनच कसबामध्ये एकही बंडखोर उभा राहिला नाही. वज्रमूठ हा त्यांचा अधिकार आहे आणि भीती देखील आहे की, जर एकत्र राहू की नाही याला खूप वेळ आहे, असे देखील यावेळी पाटील म्हणाले.
डिजिटल लॉकरची सोय करावी:नाशिकमध्ये झालेल्या प्रकाराबाबत विचारले असता ते म्हणाले की, या विषयात मी जाणार नाही. मी प्रत्येक वेळी वाक्य हे जपून बोलत असतो. त्यामुळे कधी तुम्ही तर कधी विरोधक ते वादग्रस्त ठरवत असतात. तसेच यावेळी पदवीधर बाबत पाटील म्हणाले की, आपण प्रत्येकाच्या डिग्री डिजिटल लॉकरमध्ये शिफ्ट करणार आहोत. विद्यापीठ म्हणत आहे की, एक छोटा कार्यक्रम करावा लागेल. मुलांना डिग्री लगेच मिळाली पाहिजे. सगळ्या विद्यापीठाने डिजिटल लॉकरची सोय केली पाहिजे. तसेच डीएड हा अभ्यासक्रम बंद करण्याबाबत काही माहिती नाही; मात्र सर्वच पदवी अभ्यास क्रम ४ वर्षांचे होणार आहेत. विद्यार्थ्यांच्या व्यक्ती महत्त्वाचा सर्वंकष विकास त्यातून घडेल. अभ्यासक्रम दरम्यान प्रत्येक टप्प्यावर मिळणाऱ्या क्रेडिट पॉइंट्स विद्यार्थ्याच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहेत, असेही यावेळी पाटील म्हणाले.