पुणे- सोमवारी हिंजवडी परिसरात महापोर्टलकडून कनिष्ठ लिपिक पदासाठी परीक्षा घेण्यात आली. मात्र, परीक्षा सुरू असताना वीज गेली तसेच अनेकदा परीक्षा देत असलेले संगणकही बंद पडले. यामुळे हैराण झालेल्या परीक्षार्थ्यांनी पेपरवर बहिष्कार टाकत परिसरात घोषणाबाजी केली. यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण होते. हिंजवडी पोलिसांना घटनेची माहिती महापोर्टल विरोधात महाविद्यालयीन देण्यात आली. दरम्यान, संबंधित पेपर हा रद्द करण्यात आला असल्याची माहिती परीक्षार्थ्यांनी दिली आहे.
पुण्यात महापोर्टलची परीक्षा रद्द; परीक्षेदरम्यान अनेकदा वीज खंडित झाल्याने विद्यार्थ्यांचा खोळंबा - महापोर्टल बातमी
महापोर्टलकडून कनिष्ठ लिपिक पदासाठी परीक्षा सुरू असताना वीज गेली तसेच अनेकदा परीक्षा देत असलेले संगणकही बंद पडले. यामुळे हैराण झालेल्या परीक्षार्थ्यांनी पेपरवर बहिष्कार टाकत परिसरात घोषणाबाजी केल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण होते.
सविस्तर माहिती अशी, आज सकाळी दहा ते बारा दरम्यान तीनशे ते चारशे विद्यार्थ्यांनी महापोर्टलचा पेपर दिला. यासाठी वेगवेगळ्या शहरातून परीक्षार्थी आले होते. साडेआठच्या सुमारास सर्व परीक्षार्थीं हिंजवडी परिसरातील एका महाविद्यालय केंद्रावर आले. दहाच्या सुमारास सर्वांना ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी परीक्षा केंद्रात सोडण्यात आले. परीक्षार्थी पेपर सोडवण्यास बसले होते. मात्र, पहिल्या दहा मिनिटात तीन ते चार वेळा संगणक बंद पडले. काही तांत्रिक कारणांमुळे दिलेली उत्तरेही अपलोड होत नव्हती. यात अनेकदा वीज गेल्याने वेळ जात असल्याचे विद्यार्थ्यांनी यावेळी सांगितले.
ऑनलाईन परीक्षा सुरू होऊन अर्धा तास उलटला. मात्र, हा घटनाक्रम सुरूच होता. ही समस्या उद्भवल्याने सर्व जण केंद्राच्या बाहेर आले. संतापलेल्या परीक्षार्थ्यांनी महापोर्टलच्या विरोधात घोषणाबाजी केली. दरम्यान, बाहेर पडल्यानंतर एकमेकांचे प्रश्न देखील माहीत झाले. त्यामुळे पेपर फुटल्याचा संशय परीक्षार्थ्यांनी व्यक्त केला आहे. हा सर्व घटनाक्रम झाल्यानंतर संबंधित प्रशासनाकडून आजची परीक्षा रद्द करत असल्याचे कळवण्यात आले. लवकरच परीक्षा घेण्यात येणार असून ते मेलद्वारे कळवण्यात येईल, असे सांगण्यात आले असल्याचे परीक्षार्थी योगेश घुगे याने सांगितले आहे.