बारामती (पुणे) -मागील सहा वर्षात जर पाहिले तर ईडी, सीबीआय, एनसीबी, आयकर विभाग, केंद्रीय तपास यंत्रणेकडून मोठ्या प्रमाणात कारवाया वाढल्याचे दिसून येते. या कारवायांमागे राजकीय हेतू असल्याचे सामान्य माणसालाही वाटते, असे मत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले. ईटीव्ही भारतने त्यांच्याशी विशेष संवाद साधला. या संवादात त्यांनी महागाई, इंधन दरवाढ, त्यांच्या मतदारसंघ असलेल्या कर्जत-जामखेडमधील समस्यांबाबत तसेच इतर प्रश्नांवर त्यांनी आपले विचार व्यक्त केले. पाहा ते काय म्हणाले?
ईटीव्ही भारत प्रतिनिधीने राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्याशी साधलेला संवाद प्रश्न -महागाई व इंधन दरवाढ मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यावर आपली प्रतिक्रिया काय?
उत्तर -गेल्या सात वर्षात पेट्रोल आणि डिझेलवर केंद्राने १४ लाख कोटी रुपये कर्ज स्वरूपात वसूल केला. २०१४ पर्यंत काँग्रेस आणि काँग्रेसच्या विचाराचे सरकार होते. तेव्हा इंधनाचे दर कमी होते. तसेच त्यावेळी कच्च्या इंधनाचे दर आजपेक्षा जास्त होते. तरीसुद्धा पेट्रोल डिझेलचे दर कमी होते. काँग्रेस काळातील इंधनाचे दर कायम ठेवले असते. तर आता जो १४ लाख कोटींचा कर जमा झाला आहे. तो कदाचित आठ लाख कोटींपर्यंत आला असता. याचाच अर्थ गेल्या सहा वर्षात अतिरिक्त सहा ते सात लाख कोटी रुपयांचा कर लोकांकडून वसूल केला आहे. त्यापैकी महाराष्ट्राचा १० टक्के वाटा आहे. केंद्राने लावलेल्या अतिरिक्त करामुळे देशातील ट्रक, टेम्पो, रिक्षा, मोटरसायकल या वाहनधारकांनी ६० हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त कर केंद्राच्या तिजोरीत दिला आहे. त्यामुळे पहिल्यांदाच 100 पार इंधनाचे दर गेले आहेत. इंधनाचे दर वाढले आहेत. मात्र, इतर व्यवसायातून मिळणारे उत्पन्न तेवढेच आहेत. स्टीलच्या किमती दुप्पट झाल्या आहेत. तसेच सिमेंटच्या किमती ५० टक्क्यांनी वाढल्या आहेत. परिणामी याचा भुर्दंड सर्वसामान्यांना सोसावा लागतो आहे.
प्रश्न - राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाया होत आहेत. त्यातही राष्ट्रवादीला टार्गेट केलं जातय का? यावर आपण काय सांगाल?
उत्तर - ईडी, सीबीआय, एनसीबी, आयकर विभाग, केंद्रीय तपास यंत्रणेकडून मागील सहा वर्षात मोठ्या प्रमाणात कारवाया वाढल्याचे दिसून येते. याबाबत अगदी सामान्य माणसाला जरी विचारलs तरी त्यांना असेच वाटते की, राजकीय हेतूने या कारवाया केल्या जात आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा सहसा तुम्हाला वापरायचे असते तेव्हा सर्वात भक्कम व मोठ्या नेत्यालाच नेहमी टार्गेट केले जाते. समजा पवार कुटुंबीय भक्कम पाया असलेले कुटुंब आहे. पवार साहेब, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसच्या सोनिया गांधी या तिघांनी मिळून तसेच महाविकास आघाडीचे एक नवे समीकरण त्यांनी अखंड देशाला दाखवून दिले आहे. या समीकरणामुळे आज भाजपला लोकशाही माध्यमातून ज्या निवडणुका होत आहेत त्याठिकाणी त्यांना मोठा फटका बसल्याचे दिसून येते. हा राजकीय फटका त्यांना बसत असल्याने अशा प्रकारच्या कारवाया तर होत नाहीत ना हे महत्त्वाचे आहे. लोकशाही आपल्या हातात नसली की राजकीय हेतूने अशा प्रकारच्या यंत्रणेकडून कारवाया केल्या जात असाव्यात.
हेही वाचा -महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी समाज आणि सरकार एकत्र येण्याची गरज : नीलम गोऱ्हे
प्रश्न - कर्जत जामखेड या मतदारसंघात पाण्याची समस्या होती. मात्र, आपण नेतृत्त्व करत असल्यापासून पाण्याची समस्या दूर होताना दिसतेय
उत्तर -पाण्याच्या संदर्भात नैसर्गिकरित्या पाऊस किती पडावा, हे आपल्या हातात नसते. मात्र, जेवढ्या प्रमाणात पाऊस पडतो त्या पाण्याचे योग्य नियोजन करणे हे आपल्या हातात असते. या मतदारसंघातील चाऱ्या, तीस वर्षांपासून साफ केल्या नव्हत्या. सीना प्रकल्पावर आपण 100 किलोमीटर तसेच कुकडी प्रकल्पावर १५० किमीपर्यंत चाऱ्या साफ करण्याचे व जामखेडमध्ये आवश्यक त्याठिकाणी काम केले. चाऱ्या साफ केल्यामुळे 'टेल टू हेड' पाणी द्यायला मदत झाली. तसेच या प्रकल्पांवरील आवश्यक त्यावेळी पाणी सोडण्यासाठी व बंद करण्यासाठी ४०० दारे बदलले आहेत. त्या पाण्याचे योग्य नियोजन कसे करता येईल याबाबत योग्य काम करत आहोत.
प्रश्न - आपला मतदार संघ हा सर्वाधिक शेतकऱ्यांचा आहे. शेती उत्पन्न वाढीसाठी आपणाकडून काय प्रयत्न केले जात आहेत?
उत्तर - अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन माझे वडील आहेत. त्यांचा कृषी क्षेत्रात मोठा अभ्यास आहे. त्यांनी कर्जत-जामखेड मतदार संघात शेतकरी हितासाठी आत्तापर्यंत दोनशेहून अधिक बैठका घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. तसेच कृषी विभाग, आत्मा, अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट मिळून मतदार संघात शेती उत्पन्नवाढीसाठी काम करत आहोत. आम्ही मागे तूर पिकात बदल केला. तेव्हा या बदलत्या प्रकारामुळे मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यामध्ये १२ ते १३ कोटी रुपयांचा फायदा शेतकऱ्यांना झाला. तसेच कांदा उत्पादनावरही काम सुरू आहे. शिवाय तूर, उडीद आधी कडधान्यांचे उत्पादन घेण्यासाठी मतदार संघात दहा केंद्र सुरू केले आहेत. तसेच शेतकऱ्यांना वेळोवेळी प्रशिक्षण दिले जाते. शेतकऱ्यांसह शेतकऱ्यांच्या मुलांच्या हाताला काम कसे मिळेल या दृष्टीनेही काही प्रकल्प उभारले जात आहेत. तसेच शेतमाल साठविण्यासाठी वखार महामंडळामार्फत कर्जत व जामखेड येथे प्रत्येकी ३ हजार टनाचे एक गोडाऊन बांधले आहेत. तसेच नवनवीन शेती प्रयोग केले जात आहेत.