पुणे - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली 'प्रजा लोकशाही परिषद' या अराजकीय आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. पुण्यामध्ये 15 ते 20 विविध संघटनांची बैठक होऊन ही आघाडी स्थापन करण्यात आली आहे. 20 सप्टेंबरला पुण्यात या आघाडीची सभा होणार आहे. केंद्र आणि राज्यात असलेले सरकार सामान्य बहुजन वंचित ओबीसी वर्गाचे दमन करत आहे. या वर्गाचा आवाज कायम ठेवण्यासाठी आघाडीची स्थापना करण्यात आल्याचे राजू शेट्टी यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
ही आघाडी अराजकीय आहे आणि या आघाडी मार्फत निवडणूक लढवली जाणार नाही. भाजप-सेना युती वगळता इतर समविचारी पक्षाशी बोलणी सुरू असून स्वाभिमानी तर्फेच निवडणूक लढवली जाईल, असे यावेळी राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे. सरकार ईडीची चौकशी करून विरोधकांना भयभीत करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. कडकनाथ कोंबडी घोटाळ्याप्रकरणी मी स्वतः ईडीकडे गेलो होतो. ईडीने या प्रकरणात चौकशी केली नाही तर, ईडीवर मोर्चा काढणारा मी देशातला पहिला असेल, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला आहे.