बारामती (पुणे) - राज्यात ठिकठिकाणी म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराचे रुग्ण वाढत आहेत. राज्यात आतापर्यंत ३ हजार रुग्ण आढळून आले आहेत. पुण्यापाठोपाठ बारामती तालुक्यातसुद्धा म्युकरमायकोसिस या आजाराचे २० रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर म्युकरमायकोसिसवर उपचारासाठी शासकीय ग्रामीण रुग्णालय रुई येथे स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली असून येथे रुग्णांवर मोफत उपचार सुरू करण्यात आले आहे.
माहिती देताना शासकीय ग्रामीण रुग्णालयातील प्रभारी वैद्यकीय अधीक्षक यास्मिन पटेल हेही वाचा -पुणे जिल्ह्यातील यवत गावच्या हद्दीतील प्रसिद्ध कांचन हॉटेलला लागली आग
तज्ज्ञ डॉक्टरांची टीम कार्यान्वित
म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी कान, नाक, घसा तज्ञ, दंतरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ डॉक्टरांची टीम कार्यान्वित करण्यात आली आहे. या डॉक्टरांकडून औषध उपचारांबरोबरच शस्त्रक्रियाही केली जात आहे. सध्या गंभीर शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना पुण्यात उपचारासाठी पाठविले जात आहे. मात्र, भविष्यात गंभीर शस्त्रक्रियाही या ठिकाणी करण्यात येणार असल्याचे शासकीय ग्रामीण रुग्णालयातील प्रभारी वैद्यकीय अधीक्षक यास्मिन पटेल यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.
औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध
बारामतीत म्युकरमायकोसिस रुग्णांची मोठी धावपळ होत होती. रुग्ण व नातेवाईकांना पुढील उपचार कुठे घ्यायचे याबाबत संभ्रम होता. अनेक रुग्ण बारामतीतील विविध खासगी रुग्णालयात हेलपाटे मारत होते. शिवाय फी भरूनही रुग्णालय जबाबदारी घ्यायला तयार नव्हते व रुग्णांना पुण्याला उपचारासाठी जाण्याचा सल्ला दिला जात होता. अशावेळी रुग्णांना उपचारासाठी एक ठराविक ठिकाण आवश्यक होते. ते रुई येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध झाले. या रुग्णालयात रुग्णांना आवश्यक असणाऱ्या औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध असून रुग्णांवर मोफत उपचार केले जात आहेत, अशी माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सदानंद काळे यांनी दिली.
रुग्णांना दिलासा
कोरोनाच्या वैश्विक महामारीचा प्रादुर्भाव अद्याप सुरूच असताना म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराचे नवे संकट उभे ठाकले आहे. प्रामुख्याने कोरोनामुक्त झालेल्या काही रुग्णांमध्ये हा आजार आढळून येतो. लक्षणे आढळणाऱ्या बारामतीतील रुग्णांना पुढील उपचारासाठी धावपळ करावी लागत होती, मात्र बारामतीतच उपचार सुरू झाल्याने रुग्णांना दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा -आदित्य ठाकरेंच्या लग्नासाठी मुलगीही आत्ता केंद्राने बघायची का - चंद्रकांत पाटील