पुणे : आज पहाटेपासून वन विभागाकडून सिंहगडावरील अतिक्रमण कारवाईला सुरुवात (Sinhagad Encroachment operation) करण्यात आली आहे. अतिक्रमण कारवाईसाठी सुमारे सत्तर वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तैनात असून; कायदा सुव्यवस्था टिकविण्यासाठी सात वरिष्ठ पोलीस अधिकारी व पंचावन्न पोलीस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात (started by forest department Pune) करण्यात आला आहे.
सिंहगडावरील अतिक्रमण कारवाईला सुरुवात
सिंहगडावरील खाद्यपदार्थ विक्रेते व इतर व्यावसायिकांना वन विभागाने बैठक घेऊन तसेच नोटीस देऊन, अतिक्रमणे काढून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. तरीही प्रतिसाद न मिळाल्याने वन विभागाने अखेर कारवाईचा बडगा उगारला आहे. कारवाईबाबत वन विभागाने अत्यंत गोपनीयता बाळगली होती. पहाटे पाच वाजताच वन विभागाचे अधिकारी,कर्मचारी व पोलीस कारवाईसाठी दाखल झाले आहेत.
कारवाईदरम्यान, 71 नोंदणीकृत व्यावसायिकांचे शेड व 64 नोंदणी नसलेल्या व्यावसायिकांचे शेड असे एकूण 135 शेड जमिनदोस्त करण्यात येणार आहेत. दरम्यान कारवाईला काही व्यावसायिकांचा विरोध असल्याने, अनुचित प्रकार घडू नये म्हणून वन विभाग व पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी केलेली आहे.
गेल्या काही दिवसांपुर्वी, सातारा येथील प्रतापगडाच्या पायथ्याला असलेल्या अफजलखान कबरीच्या परिसरात झालेल्या अतिक्रमाणावर सातारा जिल्हा प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली. अफजलखान वध दिनी बुलडोझर फिरवत सर्व अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. अत्यंत गोपनीयता बाळगत प्रशासनाने ही कारवाई केली. प्रतापगड परिसरात 144 कलम लागू करण्यात आले होते. तसेच, कबर परिसराकडे जाण्यास मनाई करण्यात आली होती. त्यामुळे प्रतापगड परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. कबरीच्या परिसरातील अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी प्रशासनाने मोठी तयारी केली होती. चार जिल्ह्यातील 1600 पोलिसांचा बंदोबस्त मागवण्यात आला होता. हे पोलीस रात्रीचं प्रतापगड परिसरात दाखल झाले होते. तसेच, अवजड यंत्रसामग्री प्रतापगडाकडे जात होती. महाबळेश्वरच्या बाजारपेठेत देखील पोलिसांची गस्त सुरू होती. त्यामुळे प्रशासनाकडून कसल्या तरी हालचाली सुरू असल्याची चाहूल स्थानिकांना लागली होती. मात्र, अत्यंत गोपनीयता बाळगत उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पहाटे प्रशासनाने कबरीच्या परिसरातील अतिक्रमणे भुईसपाट केली आहेत. मात्र, आता प्रतापगड पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे.