पुणे - महाविकास आघाडी सरकारमधून बंड करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप बरोबर राज्यात सत्ता स्थापन केली. यानंतर त्यांच्यावर विरोधकांकडून सातत्याने टिका देखील करण्यात आली. पण असे, असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांच्याबद्दल कौतुक केले आहे. पवार मला देखील सूचना, मार्गदर्शन करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिटयूटची ४६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या मांजरी बुद्रुक येथील कार्यालयात पार पडली. माजी केंद्रीय कृषीमंत्री तसेच संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती.
31 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी - भाषणाची सुरवात करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ज्यांच्या तोंडी नेहमी साखर असते ते शरद पवार साहेब, तसेच जयंत पाटील यांच्याही तोंडात साखर असते असे म्हणताच कार्यक्रमाच्या ठिकाणी एकच हशा पिकला. त्यापुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, अजितदादा अधिवेशन काळात जयंत पाटलांची आठवण काढली ना असे म्हणताच पुन्हा एकदा हशा पिकला. तसेच पुढे म्हणाले की, करोना काळात साखर कारखान्यांनी सामाजिक बांधिलकी जपत मदत केल्याच आपण सर्वांनी पाहिले आहे. ऊस उत्पादक शेतकरी वर्गासमोर अनेक आव्हान आहेत. त्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. हे लक्षात घेऊन आमच सरकार आल्यावर 31 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी केली आहे.
कृषी क्षेत्रात शरद पवारांचे योगदान मोठे - सिंचन विभागाचे 18 प्रकल्प मार्गी लावले असून जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू केली आहे. या योजनेचा फायदा अधिकाधिक शेतकरी वर्गाला होणार असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्याकडे आजवर अनेक वेळा भेट झाली. त्यावेळी राज्यातील शेतकर्याचे प्रश्न मांडले आहे. आपल्या राज्यातील शेतकरी वर्गा सोबत केंद्र सरकार कायम सोबत आहे. तसेच कृषी क्षेत्रात शरद पवार यांचे फार मोठे योगदान आहे. त्यांना कृषी क्षेत्राबद्दल आत्मीयता असून गाढा अभ्यास देखील आहे. शरद पवारांनी नेहमी मार्गदर्शन करावे. ज्याचा सहकार, कृषी, सरकारला फायदा होईल असे मत त्यांनी व्यक्त केले.
हार्वेस्टरसाठी शेतकऱ्यांना मदत -तसेच शेतकरी अन्नदाता असल्याने शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यास शासनाचे प्राधान्य राहील. राज्यातील हार्वेस्टरची कमतरता दूर करण्याकरिता ९०० हार्वेस्टरसाठी शासन शेतकऱ्यांना सहकार्य करेल. साखर कारखान्यांना शासनाने नेहमीच सहकार्य केले आहे. भविष्यातदेखील येणाऱ्या अडचणी दूर करण्याचे काम शासन करेल. साखर उद्योगावर लाखो शेतकरी अवलंबून असल्याने हा उद्योग वाढणे, टिकणे गरजेचे आहे. शासनाने साखर उद्योगासोबत इतरही शेतकऱ्यांचे मुलभूत प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न केले आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविताना शेतकऱ्यांसाठी १८ सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यात येत आहेत, त्यामुळे अडीच लाख हेक्टरपेक्षा अधिक जमीन ओलिताखाली येईल अशी माहिती त्यांनी दिली.
शेतकऱ्यांना १ हजार ७०० कोटींचेही वाटप - नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनात्मक अनुदान म्हणून ७ लाख १९ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अडीच हजार कोटी रुपये जमा करण्यात आले. ७ लाख २० हजार शेतकऱ्यांना १ हजार ७०० कोटींचेही वाटप करण्यात येत आहे. अतिवृष्टग्रस्त शेतकऱ्यांनाही वाढीव मदत करण्यात येत आहे. जलयुक्त शिवार योजना प्रभाविपणे सुरू करण्यात आली आहे. कृषि क्षेत्रातील संशोधनाला चालना देणे, गरजेचे कृषि उत्पादनावर प्रक्रीया करणाऱ्या उद्योगात वस्त्रोद्योगानंतर साखर उद्योगाचा क्रमांक लागतो. ग्रामीण भागाच्या विकासात या उद्योगाचे मोठे योगदान आहे. नवीन अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने कमी खर्चात अधिकचे उत्पादन करण्यासाठी व्हीएसआयचे सहकार्य मिळते आहे.
कृषि संशोधनाला चालना-संशोधन, विकास, प्रशिक्षण, विस्तार हे संस्थेचे उद्दीष्ट आहे. ऊस उत्पादनापासून साखर निर्मितीच्या तंत्रापर्यंत विविध टप्यांवर आधुनिकीकरण कसे करता येईल याबाबतचे संशोधन व्हीएसआय करत असल्याने सहकारी क्षेत्राला फायदा होत आहे. जागतिक स्पर्धेत पुढे जाण्यासाठी नवीन अद्ययावत तंत्रज्ञान वापरावे लागेल. कृषि संशोधनाला चालना मिळाली तर, राज्याच्या प्रगतीला चालना मिळेल. साखर उद्योग क्षेत्रातील संशोधनात व्हीएसआयचे मोठे योगदान आहे.
मराठवाडा, खानदेशच्या शेतकऱ्यांना फायदा -ऊसशेती, साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी कटिबद्ध असलेली तसेच शेतकऱ्यांनी स्थापन केलेली वसंतदाद शुगर इन्स्टिट्यूट ही अशा स्वरुपाची जगातली एकमात्र संस्था आहे. व्हीएसआयने जालना येथे विविध ऊसाची बियाणाची निर्मिती केली आहे. त्याचा मराठवाडा, खानदेशच्या शेतकऱ्यांना फायदा होत आहे. विदर्भातदेखील संस्थेचे केंद्र सुरू करण्यात येत आहे. कृषि विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरणाचा शास्त्रीय विचार, अल्कोहल निर्मितीचे आधुनिक तंत्र अशा, अनेक अंगांनी संस्था संशोधन करते आहे. ऊस लागवड, जमिनीची सुपीकता ऊसाच्या बेण्यातील बदल, जैविक तंत्रज्ञान अशा महत्वाच्या विषयावर संस्था शेतकऱ्यांना माहिती देते असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
साखर उत्पादनात महाराष्ट्र तिसरा -आंबोली येथे विकसीत केलेल्या व्हीएसआय ८००५ आणि १२१२१ या जातीच्या ऊसाचे क्षेत्र वाढते आहे. अवर्षण परिस्थितीत ही जात शेतकऱ्यांना हे उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. इथेनॉल निर्मितीला शासनाचे प्रोत्साहन चालू गळीत हंगामात ५०८ लाख मे.टन ऊसाचे गाळप होऊन ४७ लाख मे.टन साखरेचे गाळप झाले आहे. जगात महाराष्ट्राचा साखर उत्पादनात तिसरा क्रमांक आहे, ही अभिमानाची बाब आहे. राज्यात गतवर्षी १३७.२० लाख मे.टन साखरेचे उत्पादन झाले. १२.६ लाख मे.टन साखरेचा वापर इथेनॉलच्या निर्मितीसाठी झाला आहे. इथेनॉलला प्रोत्साहन देण्याचे शासनाचे धोरण आहे. यामुळे साखर कारखान्यांना नवसंजीवनी मिळते आहे. १०६ कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती सुरू केली आहे. चालू हंगामातही मोठ्या प्रमाणत इथेनॉल निर्मिती होईल, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.