पुणे : राज्यात बंड राष्ट्रवादीत झाले, मात्र चर्चा महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात झाली. त्यातूनच संतप्त प्रतिक्रिया राजकारणाविषयी व्यक्त होताना आपल्याला सर्वत्र दिसत आहेत. पुण्यात आज मनसेकडून एक सही संतापाची अभियान राबवण्यात आले. त्यामध्ये पुणेकरांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. कुठल्याही राजकारण्यांना आम्ही बांधील नाही, आम्हाला रोज मतदानाचा अधिकार द्या अशी मागणीसुद्धा एका नागरिकाने केली आहे.
2024 ला आम्ही दाखवून देऊ : पुणेकरांनी मात्र या सगळ्या राजकीय परिस्थितीवर संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. मोठ्या प्रमाणात सही करायला पुणेकरसुद्धा या शनिवार चौकात आले होते. आम्ही आता काहीच म्हणणार नाही, 2024 ला जेव्हा मतदान होईल तेव्हा आम्ही दाखवून देऊ की, आमची प्रतिक्रिया काय आहे. आता आम्हाला बोलण्याचा अधिकारच राजकारणाने ठेवला नाही. महागाई, बेरोजगारी यावर बोलायला कुठला राजकारणी तयार नाही. त्याबद्दल आम्ही 2024 ला मतदानातून राजकारण्यांना दाखवून देऊ अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.