पुणे- जिल्ह्यातील वडगाव मावळ येथे पाच अज्ञात महिलांच्या टोळक्याने कपड्याच्या दुकानातून आठ हजार रुपयांचे आठ फ्रॉक चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यांनी केलेली चोरी सीसीटीव्हीत कैद झाली असून महिलांनी हातचलाखीने चोरी केल्याचे सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत आहे. याप्रकरणी बेबीज मॉल नावाच्या मालकीण अनिता विलास रावल यांनी वडगाव मावळ पोलिसात तक्रार दिली आहे.
सराईत महिलांच्या टोळक्याने चोरले आठ हजारांचे ड्रेस; घटना सीसीटीव्हीत कैद - लहान मुलांचे ड्रेस
वडगाव मावळ येथे अज्ञात पाच महिलांच्या टोळक्याने लहान मुलांच्या कपड्याच्या दुकानात जाऊन आठ हजार रुपयांचे आठ फ्रॉक हातचलाखी करून लंपास केले आहेत. त्यांनी केलेली चोरी सीसीटीव्हीत कैद झाली.
या प्रकरणी लक्ष्मीबाई दीपक जाधव वय, लता सुरेश जाधव (रा. देहूरोड) यांच्यासह पाच महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी बेबीज मॉल या लहान मुलांचे खेळणी व कपडे विक्री करणाऱ्या दुकानात संबंधित महिला आल्या होत्या. एकीने काउंटरवरील महिलेला बोलण्यात गुंतवले. तर दुसरीला महिलांच्या टोळक्यातील दुसऱ्या महिलेने साड्या बघण्यात लक्ष केंद्रीत केले. तेव्हा, काउंटर समोरील तीन महिलांपैकी एकीने साडी वर धरली आणि बाळ असलेल्या महिलेने क्षणार्धात काही ड्रेस बाळाच्या आणि पदराच्या खाली लपवले. हा सर्व चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या घटने प्रकरणी पाच महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचा शोध वडगाव पोलीस घेत आहेत.