पुणे -बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राद्वारे शेतकऱ्यांना शेतीविषयक नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती करून दिली जात आहे. याच पद्धतीने राज्यातील अन्य भागातील शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती उत्पादन व शेती तंत्रज्ञानाची माहिती करून देण्यासाठी राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये 'कृषी तंत्रज्ञान सप्ताह' सुरू होण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून प्रयत्नशील आहे. शेतकरी बांधवांच्या जीवनात आनंद फुलविण्यासाठी राज्याच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी अनेक महत्वपूर्ण योजना राबवण्यात येत आहेत. अशी माहिती कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली.
माहिती देताना कृषीमंत्री दादा भुसे हेही वाचा -दौंडमध्ये बर्ड फ्लूमुळे कोंबड्यांचा मृत्यू
माती परीक्षण करून त्या-त्या भागातील मातीनुसार शेतीमध्ये खते वापरण्याबाबतचे फलक लावण्यात येत आहेत. यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास निश्चितच मदत होईल, असे भुसे म्हणाले. शारदानगर कृषीविज्ञान केंद्रात राष्ट्रीय अजैविक ताण प्रबंधन संस्थान, अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती आणि बायर कंपनी या तिघांच्या संयुक्त प्रयत्नातून यंदाचा कृषिक 2021 कृषी तंत्रज्ञान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी भुसे बोलत होते.
शेतकऱ्यांसाठी 'विकेल ते पिकेल' ही संकल्पना...
महाडीबीटी पोर्टलवर एकाच अर्जाद्वारे कृषी विभागाच्या अनेक योजनांचा लाभ मिळवून देण्यात येत आहे, असे सांगून कृषी मंत्री दादा भुसे म्हणाले, शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्याच्या दृष्टीने 'विकेल ते पिकेल' ही संकल्पना राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकून घेऊन ते गतीने सोडवण्यासाठी विविध कक्ष स्थापन करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांबरोबरच राज्यातील शेतमजुरांना विविध कौशल्यांची माहिती देऊन कौशल्यावर आधारीत कुशल शेतमजूर बनवण्यासाठी कृषी विभागाच्यावतीने प्रयत्न करण्यात येत आहे. कृषी विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमांची माहिती त्यांनी यावेळी दिली.
तंत्रज्ञान व शेती उत्पादनांच्या प्रदर्शनाला भेट..
कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनी सुरुवातीला कृषी विज्ञान केंद्राला भेट देवून शेतीविषयक विविध औजारे, तंत्रज्ञान व शेती उत्पादनांच्या प्रदर्शनाला भेट देऊन पहाणी केली. यानंतर डेअरी प्रकल्प केंद्राला भेट देऊन येथील विविध सोयी-सुविधांची पहाणी केली. यानंतर माळेगाव खुर्द येथील राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेला (एनआयएएसएम) भेट देऊन पहाणी केली. यावेळी खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व अन्य मान्यवरांनी सायन्स पार्कला भेट देऊन विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रात्यक्षिकांची पहाणी करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
हेही वाचा -चर्चा तर होणारच! विजयी पतीला खांद्यावर बसवून पत्नीने काढली मिरवणूक