पुणे - झटपट श्रीमंत होण्यासाठी एटीएममधून ७७ लाखांची रोकड लंपास करणाऱ्या दोन उच्चशिक्षित चोरट्यांना गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून ६६ लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. मनोज उत्तम सूर्यवंशी (वय-३० रा. पिंपरी गाव मूळगाव जळगाव) किरण भानुदास कोलते (वय ३५ रा.चिखली मूळगाव, जळगाव) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
माहिती देताना पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश हेही वाचा -'रोहित पवारांनी शरद पवारांच्या खांद्यावरुन खाली उतरून आपली उंची मोजावी'
दिघी पोलीस ठाण्याच्या परिसरात वडमुखवाडी आणि माऊलीनगर येथे चोरट्यांनी एटीएम फोडून ७७ लाखांची रक्कम लंपास केली होती. दरम्यान, यातील आरोपी मनोज सूर्यवंशी याने इलेक्ट्रॉनिक डिप्लोमा केला असून, काही वर्ष त्याने एटीएम मशीन बनवण्याच्या कंपनीत काम केले होते. तसेच तो एटीएममध्ये बिघाड झाल्यास दुरुस्तीचे काम पाहायचा. त्यामुळे त्याला एटीएम मशीनमधील सर्व माहिती होती. त्यानंतर त्याने काम सोडले होते. त्यानंतर जळगाव भुसावळ येथील ओळखीचा मित्र किरण कोलते याला सोबत घेऊन एटीएम फोडून झटपट श्रीमंत होण्याची योजना आखली. त्यानुसार त्यांनी दोन एटीएमची रेकी करून डिजिटल लॉक तोडून एटीएममधील तब्बल ७७ लाख रुपये लंपास केले होते. पैकी काही रक्कम कोलतेच्या घरी तर आरोपी किरण काम करत असलेल्या कंपनीत लपवून ठेवली होती. त्यांनी काही पैसे मौजमजेत उडवले आहेत, असे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
तांत्रिक तपास करत गुन्हे शाखा युनिट तीनने दोघांना अटक केली आहे. दरम्यान, अधिक तपासात दोघांनी २०१७ मध्ये देखील तळेगाव दाभाडे येथे एटीएम फोडले असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त सुधिर हिरेमठ, सहआयुक्त (गुन्हे) आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर बाबर, सहायक पोलीस निरीक्षक सतिश कांबळे, पोलीस उपनिरीक्षक गिरीश चामले, कर्मचारी हजरत पठाण, यदु आढारी, सचिन मोरे, सागर जैनक, त्रिनयन बाळसराफ, प्रविण पाटील, गंगाधर चव्हाण, योगेश्वर कोळेकर, राजकुमार हनमते, राहुल सुर्यवंशी, विठ्ठल सानप, महेश भालचिम, प्रमोद ढाकणे, नाथा केकाण, गजानन आगलावे व नागेश माळी यांनी केली आहे.