पुणे- आमचं महाविकास आघाडीचे सरकार व्यवस्थित चालवायचं आहे. ते चालवत आहोत. नारायण राणे हे केंद्राचे मंत्री आहे. त्यांनी त्यांचं केंद्रातील काम करावं आणि आम्ही आमचं राज्यातील काम करू, असं प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दिले.
माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम २६/(१) अन्वये प्रसिध्द झालेल्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या प्रारूप विकास योजनेचे सादरीकरण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
जनआशीर्वाद यात्रेमुळे कोरोना वाढला तर याला जबाबदार कोण?
जिथं गर्दी होते आणि जिथं नागरिक नियमांचं पालन करत नाही तिथं कोरोना वाढत आहे, हे आपण पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत पाहिलेच आहे. केरळमध्येही आपण पाहिले की तिथे सण झाल्यानंतर आज तिथं रुग्णसंख्या वाढत आहे. आपण पाहिलं की केंद्र सरकार एकीकडे सांगत आहे की लक्ष द्या आणि दुसरीकडे जे नवीन चार मंत्री झाले आहे त्यांना सांगतंय की यात्रा काढा. तसेच त्या यात्रेमुळे गर्दी होत आहे. जिथं जिथं यात्रा झाल्या आहे तिथं तिथं गर्दी झाली आहे. येणाऱ्या काळात या भागात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झालेली दिसेल. रुग्णसंख्या वाढू नये या मताचे आम्ही आहोत. मात्र, उद्या या यात्रामुळे रुग्णसंख्या वाढली तर याला जबाबदार कोण याचा विचार ही केंद्राने केला पाहिजे, असेदेखील यावेळी अजित पवार म्हणाले.
हेही वाचा -स्वत:वरील केसेस कशा काढायच्या हे अजित पवारांकडून शिकावे - नारायण राणे
नारायण राणेंनी अजित पवार यांच्यावर केली होती टीका -
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल राणेंवर टीका करताना निधी येत नसल्याचे म्हटले होते. यावर राणे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. अजित पवार अज्ञानी असल्याचे ते म्हणाले. आपले खाते रोजगार निर्माण करणारे असल्याचेही ते म्हणाले. माझ्याकडे असलेले खाते दरडोऊ उत्पन्न वाढवणारे, जीडीपी वाढवणारे, निर्यात वाढविणारे असून सर्वांनी उद्योजक होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला होता. त्यावरुन आज (रविवारी) अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर निशाणा साधला.