बारामती -कोरोना विषाणूच्या वाढत्या परिणामांमुळे देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे बळीराजाला मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. वाहतूक व्यवस्था बंद असल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील माल शेतातच पडून असल्याने ते चितांग्रस्त असल्याचे दिसून येत आहे. एका बाजूला शेतकऱ्यांची अशी परिस्थिती असतानाच बारामतीतील प्रल्हाद वरे या शेतकऱ्याने नामी शक्कल लढवत कृषीमाल विकण्यास सुरुवात केली आहे. माल खरेदी करण्यासाठी ग्राहकही चांगली प्रतिसाद आहेत.
नामी शक्कल लढवत टरबूजविक्री; बारामतीमधील शेतकऱ्याचे कौतुक - baramai corona update
कोरोनामुळे वाहतूक व्यवस्था बंद, मार्केट बंद, खरेदीदार नाही, ग्राहक नाही अशी अवस्था असल्यामुळे एका टरबूज उत्पादक शेतकऱ्याने नामी शक्कल लढवत व्हाट्सअॅप आणि फेसबुक या माध्यमांचा वापर करत ग्राहकांना कृषीमाल विक्री करत आहेत.
थेट शेतातच मालाची विक्री -
बारामती तालुक्यातील मळद गावातील प्रल्हाद वरे यांनी त्यांच्या सहा एकर शेतामध्ये विविध जातींच्या कलिंगडाची लागवड केली होती. सध्या त्यांच्या शेतातील कलिंगड, टरबूज विक्रीसाठी तयार झाले आहेत. मात्र, कोरोनामुळे वाहतूक व्यवस्था बंद, मार्केट बंद, खरेदीदार नाही, ग्राहक नाही अशी अवस्था असताना वरे यांनी नामी शक्कल लढवत व्हाट्सअॅप, फेसबुक या माध्यमांचा वापर करत ग्राहकांना थेट शेतातच बोलवून आपला माल विकत आहेत. याला ग्राहक देखील चांगला प्रतिसाद देत आहे. शेतातच विक्री व्यवस्था सुरू केल्याने त्यांचे होणारे मोठे नुकसान टळले आहे.
शेता लगतच उभारला स्टाॅल -
माझ्याजवळील कलिंगडच्या आतील गर पिवळा आहे, तर टरबूज वरून गर्द पिवळे आणि आतून गर पांढरा असल्याने चवीला गोड असल्याचे वरे सांगतात. मालाला गोडी असल्याने ग्राहकांची मागणी वाढत आहे. त्यांनी सध्या त्यांच्या शेतालगतच एक छोटासा स्टॉल उभारला आहे. बारामती तालुक्यातील मळद-निरावागज रस्त्यावरच हा स्टॉल उभारला असून याठिकाणी कुठलीही गर्दी न करता, मालाची विक्री केली जात आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.