पुणे-येथील बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी अर्थात डीएसके यांच्या संपत्तीचा लिलाव करण्याचे आदेश विशेष न्यायालयाने दिले आहेत. या आदेशामुळे गुंतवणूकदारांना दिलासा मिळण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे लिलावातील रकमेतून आधी आम्ही गुंतवणूक केलेले पैसे परत करावे, अशी मागणी डीएसकेच्या ठेवीदारांनी केली आहे.
'डीएसकेच्या जप्त मालमतेच्या लिलावातून आधी ठेवदारांचे पैसे परत करा' हेही वाचा-पंजाब, केरळनंतर पश्चिम बंगालही सीएए विरोधी ठराव मांडणार
ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके आणि त्यांच्या पत्नी तुरुंगात आहेत. दरम्यानच्या काळात डीएसके आणि नातेवाईकांच्या नावावर असलेल्या एकूण 463 मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. यात स्थावर तसेच जंगम मालमत्तांचा समावेश आहे. डीएसके यांनी सुमारे दोन हजार कोटींचा घोटाळा केलेला आहे. कर्जदात्या बँकांसह सुमारे 33 हजार गुंतवणूकदारांची त्यांनी फसवणूक केली. हे ठेवीदार तसेच बॅंकांचे पैसे परत मिळावेत यासाठी डीएसके यांच्या संपत्तीचा लिलाव करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती. त्याची दखल न्यायालयाने घेतली असून डीएसके यांच्या संपत्तीचा लिलाव करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे ठेवीदारांना पैसे परत मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
सक्तवसुली संचालनालय तसेच राज्य सरकारने डीएसके यांच्या जप्त केलेल्या संपत्तीचा लिलाव करण्यासाठी जाहीर नोटीस काढावी. नोटीस काढल्यानंतर या संपत्तीबाबत कुणाची हरकत असल्यास 3 फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर राहून आपल्या हरकती नोंदवाव्यात, असे न्यायालयाने म्हटले आहे. या हरकतींचा निपटारा झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. डीएसकेकडे गुंतवलेले पैसे परत मिळाले नसल्याकारणाने पुण्यातील तानाजी कोरके या रिक्षाचालकाने आत्महत्या केल्याची घटना गेल्याच आठवड्यात घडली होती. डीएसकेच्या संपत्तीचा लिलाव झाल्यास फसवणूक झालेल्या ठेवीदारांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली. दरम्यान, डीएसकेकडून जप्त करण्यात आलेल्या तेरा आलिशान गाड्यांचा येत्या 15 फेब्रुवारीला लिलाव होणार आहे. डीएसके यांच्याकडील 46 पैकी 20 वाहने जप्त करण्यात आलेली आहेत. लिलाव करण्यात येणाऱ्या वाहनांची किंमत दोन कोटी 57 लाख 50 हजार रुपये इतकी आहे.