पुणे- मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्या गाडीचे चालक मनोज सातपुते यांना मारहाण झाली आहे. सातपुते यांचे मुंबईतून अपहरण करुन त्यांना मारहाण करण्यात आली. यानंतर सातपुते यांना ओमनी गाडीतून पुणे- अहमदनगर महामार्गावरील सुपा (ता. पारनेर, जि. अहमदनगर) येथे माळरानावर बेशुद्धावस्थेत सोडून देण्यात आल्याची धक्कादायक घटना ५ जुलैच्या रात्री घडली.
अजित पवारांचा मुलगा पार्थ पवारांच्या ड्रायव्हरला मारहाण करुन सोडले पुणे-नगर महामार्गावर - ड्रायव्हर
पार्थ पवार यांच्या गाडीचा चालक मनोज सातपुते याचे अपहरण करुन मारहाण झाल्याने खळबळ उडाली. मारहाणीमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शिक्रापूर पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेत पुढील तपास कुलाबा पोलिसांकडे वर्ग केला आहे.
मनोज सातपुते यांच्या तक्रारीनुसार हा प्रकार ५ जुलैला रात्री ८ वाजता घडला. मुंबईतील कुलाबा बेस्ट डेपोजवळुन खासगी काम करुन आमदार निवासाकडे येत असताना, एक लाल रंगाची ओमनी गाडी माझ्याजवळ आली व तू पार्थ पवारांच्या गाडीचा चालक आहेस का?,असे त्यांनी मला विचारले. आम्हाला त्यांना भेटायचे आहे. त्यांचा पत्ता आम्हाला सापडत नाही. त्यांना एक वस्तू द्यायची आहे, असे म्हणून त्यांनी मला गाडीच्या पुढच्या सिटवर बसविले. यावेळी गाडीत पाठीमागच्या बाजूला एकजण बसलेला होता. त्याच्याशी माझे काहीच बोलणे झाले नाही. गाडी कुलाबा सर्कल येईपर्यंतचे मला आठवत आहे. मात्र त्यानंतरचे मला काही आठवत नाही. दुसऱ्या दिवशी ६ जुलैला सकाळी आठ वाजता पुणे-अहमदनगर महामार्गावर सुपा (ता. पारनेर, जि.अहमदनगर) येथे मी रस्त्याच्या कडेला पडल्याचे माझ्या लक्षात आले, असे सातपुते यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले.
पार्थ पवारांच्या गाडीचे चालक मनोज सातपुते हे मुळचे सणसवाडी येथील रहिवासी आहेत. सुपा येथील घटनास्थळावरुन ते एसटी बसने सणसवाडी येथे येवून खासगी रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी आई-वडिलांसमेवत शिक्रापूर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञातांवर अपहरण आणि मारहाणीचे गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास कुलाबा पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी दिली.