पुणे- तब्बल 5 दशकांहून अधिक काळानंतर बारामती तालुक्यातील जिरायत भाग असलेल्या 27 गावांंचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. स्थानिक नागरिकांच्या लोकसहभागातून 'पानी फाउंडेशन'ने 2 लाख 73 हजार 259 घनमीटर एवढे श्रमदान केल्याने सुमारे 3.76 मीटरने भूजल पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे हजारो लिटर पाणी साठवून राहणार आहे.
बारामती तालुक्यातील 27 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटायचा होता. गेली अनेक वर्षे राज्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा याबाबत हतबल होती. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, विधानसभा असो की लोकसभा यामध्ये तालुक्यातील 27 गावांचा पाणी प्रश्नाचा मुद्दा नेहमीच चर्चिला गेला. परंतु, कोणत्याही राजकीय पक्षाला हा प्रश्न सोडविण्यास पूर्ण यश मिळविता आले नाही. मात्र, हा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी स्थानिक नागरिक व 'पानी फाउंडेशन'ने पुढाकार घेत जलसंधारणाची कामे करून पाण्याचा प्रश्न मार्गी लावला.
दरवर्षी, या टंचाईग्रस्त गावांना जानेवारीपासूनच टँकरने पाणीपुरवठा करावा लागत होता. मात्र, गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने तसेच ओढाखोलीकरण, रुंदीकरण, तलावातील गाळ काढणे, समतल चर खणणे, विहीर दुरुस्ती, बंधारे बांधणी आदी कामे केल्याने गेली 55 वर्ष भेडसावणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.