पुणे (पिंपरी चिंचवड)PSI Somnath Zende News-सर्वत्र विश्वचषकचा फिवर दिसून येत आहे. क्रिकेट प्रेमींसाठी हा सगळ्यात आनंददायी क्षण आहे. क्रिकेट म्हणजे सर्वांच्या आवडीचा खेळ, काही जण ग्राऊंडवर खेळतात तर काही जण मोबाईलवरदेखील क्रिकेट खेळतात. त्यातच जर क्रिकेट बघून कुणाला कोट्यवधींची कमाई झाली तर यापेक्षा वेगळा आनंद काय असणार? असाच आनंद पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे अनुभवत आहेत.
अनेकदा आले अपयश-पीएसआय सोमनाथ झेंडे हे पिंपरी चिंचवड पोलीस मुख्यालयातील आरसीपीमध्ये नेमणुकीला आहेत. त्यांना क्रिकेटची आवड असल्याने ते सध्या सुरू असलेल्या क्रिकेटच्या सामन्यांवर गेमिंग ॲपमध्ये आपली टीम लावून सहभागी झाले. त्यांनी गेल्या 2-3 महिन्यांपासून गेमिंग ॲप खेळण्यास सुरूवात केली. मात्र नेहमीच त्यांच्या पदरी अपयश आले.
कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण-काल (दि 10) मंगळवारी देखील ड्युटीवर असताना त्यांनी चालत-बोलत बांग्लादेश विरूध्द इंग्लंडच्या क्रिकेट मॅचवर टीम लावत सहभागी झाले. काही वेळातच त्यांनी लावलेली टीम अव्वल येत त्यांना बक्षीस लागलं. ते बक्षीस बघून त्यांना सुखद धक्काच बसला. सोमनाथ झेंडे यांना तब्बल दीड कोटी रूपयांचं बक्षिस लागल्यानं त्यांच्या कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
सुरुवातीला विश्वास बसला नाही-पीएसआय सोमनाथ झेंडे यांनी सांगितले की, मी गेल्या अनेक महिन्यांपासून फावल्या वेळात गेमिंग ॲपवर टीम लावत असतो. मात्र मला कधीच यश आले नाही. कालदेखील ड्युटीवर असताना मी ध्यानीमनी नसताना मी गेमिंग ॲपवर टीम लावली. ती टीम अव्वल ठरली. यामध्ये सुरुवातीला मला दीड कोटींच बक्षीस लागलं, असा संदेश प्राप्त झाला. मला सुरुवातीला त्यावर विश्वास बसला नाही. मात्र, त्यानंतर मला जेव्हा दोन-दोन लाख रुपये मिळू लागले तेव्हा मला आनंदाचा सुखद धक्का बसला.