पुणे : डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यांच्याबाबतील तपासात अनेक नवीन गोष्टी समोर येत आहेत. पुण्यातील संरक्षण संशोधन संस्थेचे (डीआरडीओ) संचालक प्रदीप कुरुलकर यांनी हनीट्रॅपमध्ये अडकवून पाकिस्तानला माहिती दिल्याचा आरोप आहे. त्यांना एटीएसकडून अटक करण्यात आली होती. आज कुरुलकर यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांना 14 दिवसांची म्हणजेच 29 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. कुरुलकर यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
येरवडा कारागृहात रवानगी: पुण्यातील संरक्षण संशोधन संस्थेचे (डीआरडीओ) संचालक प्रदीप कुरुलकर यांना 2 मे रोजी अटक करण्यात आली होती. कुरुलकर यांना अटक केल्यानंतर 9 तारखेपर्यंत एटीएस कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर 9 तारखेला त्यांना पुण्यातील शिवाजी नगर येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांना 15 तारखेपर्यंत एटीएस कोठडी देण्यात आली होती. कुरुलकर यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांना एक दिवसाची एटीएस कोठडी देण्यात आली होती. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आणि तेव्हा न्यायालयाने कुरुलकर यांना 29 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आत्ता कुरुलकर यांची येरवडा कारागृहात रवानगी झाली आहे.
कोठडीत आवश्यक औषधे पुरवा : आज न्यायालयात कुरुलकर यांना हजर केल्यानंतर त्याचे वकील यांच्याकडून मागणी करण्यात आली की, कुरुलकर यांना हेवी शुगर असून त्यांना न्यायालयीन कोठडीत आवश्यक औषधे पुरविण्यात यावी. यावर न्यायालयाने त्यांना परवानगी दिली आहे. तसेच याआधीही डीआरडीओचे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर देशाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपाखाली तुरूंगात होते. त्यांना १५ मेपर्यंत एटीएस कोठडी देण्यात आली होती. या प्रकरणी त्यांची पोलिग्राफी टेस्ट केली जाणार आहे.