महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Pradeep Kurulkar News: डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर यांनी हनीट्रॅपमध्ये 'या' तथाकथित मुलीसोबत शेअर केली क्षेपणास्त्राची माहिती - झारा दास गुप्ता

पुण्यातील संरक्षण संशोधन संस्थेचे संचालक प्रदीप कुरुलकर यांना हनीट्रॅपमध्ये अडकवून पाकिस्तानला माहिती दिल्याचा आरोप असल्याने त्यांना एटीएसकडून अटक करण्यात आली आहे. यावेळी त्यांच्यासोबत झारा दास गुप्ता नावाची महिला संवाद साधत असल्याचे समोर आले आहे. कुरुलकर यांना अटक केल्यानंतर त्यांना 9 तारखेपर्यंत एटीएस कोठडी देण्यात आली होती. बुधवारी त्यांना पुण्यातील शिवाजी नगर येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांना 15 तारखेपर्यंत एटीएस कोठडी देण्यात आली आहे.

Pradeep Kurulkar News
डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर

By

Published : May 11, 2023, 7:21 AM IST

पुणे : दिवसेंदिवस गुन्हेगारी, फसवणुकीचे प्रमाण वाढत आहे. यातीलच एक प्रकार म्हणजे हनीट्रॅप होय. चक्क या हनिट्रॅपमध्ये संरक्षण संशोधन संस्थेचे संचालक अडकले असल्याचे समोर आले आहे. डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर यांना हनीट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी पाकिस्तानकडून झारा दास गुप्ता या बनावट महिलेच्या नावाने अकाऊंट बनवले. त्यांच्याशी ऑक्टोबर महिन्यापासून संपर्क साधण्यास सुरुवात झाली होती. एक महिला लंडनमधून सोशल मीडियावर बोलत असल्याचे त्यांना भासवले गेले.

सोशल मीडियावर संवाद :सोशल मीडियावर सुरू झालेला संवाद हा पुढे व्हॉट्सअपपर्यंत पोहचला. अतिशय खाजगी संवादाबरोबरच कुरुलकर यांना त्या तथाकथित दासने विविध क्षेपणास्त्राची डिझाइनची माहिती विचारली आहे. हे सगळे संभाषण एटीएसच्या तपासात समोर आले आहे. कुरुलकर यांनी संवेदनशील माहिती अजून काही शत्रू राष्ट्राला दिली आहे का? याचा आता तपास हा एटीएससह देशातील इतर गुप्तचर यंत्रणा करत आहे.


संशोधनाबाबत माहिती विचारली :प्रदीप कुरुलकर यांच्याशी जेव्हा झारा दास गुप्ता या नावाने फेसबुकवर संवाद साधला गेला, तेव्हा ती लंडनमध्ये असून ती मूळची पश्चिम बंगालची असल्याचे सांगितले गेले. हळूहळू संवाद हा खूप मोठ्या प्रमाणावर पुढे वाढत गेला. तो संवाद हा खासगी पातळीपर्यंत गेला. डीआरडीओकडून देशातील वेगवगेळ्या प्रयोगशाळांमध्ये सुरु असलेल्या संशोधनाबाबत माहिती विचारली जाऊ लागली. त्याचबरोबर भारतीय बनावटीच्या क्षेपणास्त्रांची डिझाइन्स देखील मागण्यात आली होती. त्याचबारोबर भारत संरक्षण क्षेत्रात इतर कोणत्या देशांसोबत व्यवहार करत आहे, याचीही महिती विचारली जात होती. ही माहिती का मागितली जात होती, याबाबत कुरुलकर यांना काहीही संशय आला नाही. संशय आला का नाही, नेमके असे का घडले? याबाबतचा तपास एटीएस करत आहे.



इंटरनेटचा आयपीएड्रेस पाकिस्तानमधील : झारा दास गुप्ता या तथाकथित महिलेचा मोबाईल नंबर जरी लंडनमधला असला तरी इंटरनेटचा आयपीएड्रेस मात्र पाकिस्तानमधील होता. याची माहिती आयबीला लागल्यावर त्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले. फेब्रुवारी महिन्यात डीआरडीओच्या दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. त्यानंतर पीएमओ आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांना याची कल्पना देण्यात आली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास एटीएसकडे देण्याचा निर्णय झाला.


एटीएसच्या माध्यमातून तपास :बुधवारी झालेल्या कोर्टाच्या सुनावणीमध्ये अजून एक बाब पुढे आली की, प्रदीप कुरलकर हे डीआरडीओच्या गेस्ट हाऊसमध्ये काही महिलांना भेटले आहे. त्या महिला नेमक्या कोण आहे, का त्यांची भेट झाली या मागील नेमके कारण काय आहे? याचा तपास देखील आत्ता एटीएसच्या माध्यमातून होणार आहे. विशेष म्हणजे कुरुलकर यांनी शासकीय पासपोर्टचा देखील वापर हा केला आहे. त्याची माहिती देखील घेण्यात येत आहे. का या पासपोर्टचा वापर हा मोठ्या प्रमाणावर करण्यात आला, कोणाशी भेट झाली? जर भेट झाली असेल तर त्या भेटीत काही माहिती दिली गेली का? याचा सर्व तपास आत्ता एटीएसच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.


पाकिस्तानी हेरांना भेटल्याचा संशय : प्रदीप कुरुलकर यांनी वर्षभरात अनेकदा परदेशात दौरे केले आहे. या काळात ते पाकिस्तानी हेरांना भेटल्याचा देखील संशय आहे. जर त्यांनी भेट घेतली असेल, तर मग त्यांनी कोणती कार्यालयीन गोपनीय माहिती दिली का? त्यासाठी कोणत्या इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा वापर केला आहे का? याचा तपास देखील करण्यात येत आहे. या प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत, पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  1. हेही वाचा : Pradeep Kurulkar News : अश्लील फोटोसाठी डीआरडीओ संचालक प्रदीप कुरुलकरकडून विश्वासघात, पाकिस्तानला 'ही' दिली माहिती
  2. हेही वाचा : Pradeep Kurulkar ATS Custody : डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर यांना १५ मेपर्यंत एटीएस कोठडी
  3. हेही वाचा : NCP Protest Against Pradeep Kurulkar: प्रदीप कुरुलकर यांना फाशी द्या...राष्ट्रवादीचे आंदोलन करत आरएसएसवरून घोषणाबाजी

ABOUT THE AUTHOR

...view details