पुणे- विविध सामाजिक चळवळीत अग्रेसर राहिलेले बाबा आढाव 1 जून रोजी 91 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. 1953 पासून ते विविध सामाजिक चळवळीत आहेत. समाजातील गरीब, कष्टकरी, शोषित, दिनदुबळ्या घटकांना माणूसपण मिळवून देण्यात त्यांचे फार मोठे योगदान आहे. वृक्षलागवड करून यंदा बाबांचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे. बाबा आढाव यांच्या आजवरच्या चळवळीत सोबत राहिलेले आणि सध्या बांधकाम मजदूर सभेचे अध्यक्ष असलेले ऍड मोहन वाडेकर यांनी याबद्दल माहिती दिली.
वाडेकर म्हणाले, लॉकडाऊनच्या काळात देशभरातील मजुरांवर जे काही अत्याचार झाले ते सहन करण्यापलिकडील आहेत. हे पाहून बाबांना खूप दुःख झाले. बाबांनी आजवर अनेक घटकांमध्ये काम केले. यातील एक गोष्ट म्हणजे 1971-72 च्या दुष्काळानंतर मराठवाड्यातील अनेक नागरिक पुण्यात आले. त्यांनी पुण्याच्या वेगवेगळ्या भागात झोपडया बांधायला सुरुवात केली. या झोपडपट्ट्यांना आधार देण्याचे काम बाबा आढावांच्या झोपडी संघ आणि समाजवाद्यांनी केले.