बारामती (पुणे) - पोटात अचानक रक्तस्त्राव झाल्याने आठ महिन्यांच्या गर्भवती महिलेची रक्ताची पातळी प्रचंड खालावलेली, रक्तासह प्लेटलेट डब्ल्यू.बी.सी कमी झाल्याने गर्भवती महिलेची परिस्थिती गंभीर झाली होती. प्राण जाण्याच्या अवस्थेत असणाऱ्या गर्भवती महिलेला जीवदान मिळण्यास आमदार रोहित पवार यांच्या मदतीने बारामतीतील डॉक्टरांच्या टीमला यश आले.
हेही वाचा -पुण्याच्या भवानी पेठेतील हॉटेल मिलनवर पालिकेची कारवाई, एक लाखाचा दंड वसूल
कर्जत तालुक्यातील सदर महिला घरात अचानक पडल्याने तिच्या पोटात दुखू लागल्याने सोनोग्राफी करण्यात आली. तपासणीत गर्भाशयात रक्तस्राव झाल्याचे समजले. प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने रक्ताची पातळी घटून प्लेटलेटही कमी झाले होते. त्यामुळे, महिलेला कर्जत येथील डॉक्टरांनी पुण्यात उपचारासाठी जाण्यास सांगितले. मात्र, पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने महिलेचे कुटुंबीय विचारात पडले. त्यावेळी कुटुंबातील सदस्यांनी आमदार रोहित पवार यांना फोनवरून घटनेची माहिती दिली. रोहित पवार यांनी रुग्णाची परिस्थिती लक्षात घेऊन बारामती येथील चैतन्य टेस्टट्युब बेबी सेंटरचे डॉ. आशिष जळक यांच्याकडे योग्य उपचार मिळतील, असे सुचवले व संबंधित डॉक्टरांना तशी तयारी करायला सांगितली.
आमदार रोहित पवार यांनी संबंधित महिलेचे रिपोर्ट व्हॉट्सअॅपद्वारे डॉक्टरांना पाठवले. डॉक्टरांनी रिपोर्ट पाहून रुग्णालयात सर्व पूर्वतयारी केली. महिला बारामती येथील रुग्णालयात पोहोचताच बारामतीतील डॉ. आशिष जळक, डॉ. अजित देशमुख, भूलतज्ञ डॉ. शशांक शहा यांनी अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून महिलेचे प्राण वाचविले. दरम्यान, रोहित पवार यांच्या आई सुनंदा ताई पवार यांच्याकडून वेळोवेळी फोनवरून होत असलेल्या चौकशीमुळे महिलेला व नातेवाईकांना धीर मिळाला. सहा दिवसांनंतर आज त्या महिलेला रुग्णालयातून सुखरूप घरी सोडण्यात आले.
हेही वाचा -पुणे : ग्राहक नसल्याने तब्बल साडेचार टनहुन अधिक कलिंगड खराब