पुणे - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अवैध दारूविक्री संदर्भात चंद्रपूर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर जिल्ह्यातील दारूबंदी उठण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दारूबंदी उठण्यासंबधीची बातमी खूप अस्वस्थ करणारी बाब आहे, अशी प्रतिक्रिया जिल्ह्यात दारूबंदीसाठी चळवळ उभी करणारे डॉक्टर अभय बंग यांनी दिली आहे. ते 'मनशक्ति 2020' या कार्यक्रमानिमित्त पुणे येथे आले होते.
'दारू हा स्त्रियांचा सर्वात मोठा शत्रू' चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी तेथील लाखो स्त्रियांची मागणी होती. मी फक्त त्यांना संघटीत करण्याचे काम केले. दारू हा स्त्रियांचा सर्वात मोठा शत्रू आहे. दारूमुळे स्त्रियांना मारहाण होते, अत्याचार होतात, त्यांचे संसार उद्ध्वस्त होतात. त्यांचा विचार व्हायला हवा, असे मत डॉक्टर बंग यांनी मांडले. हेही वाचा - अजमेर बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार दहशतवादी जलीस अन्सारीला कानपूरमधून अटक
सरकारचे म्हणने आहे की, दारूबंदी झाल्यापासून अवैध दारूविक्री वाढली. मात्र, हा शब्दांचा खेळ आहे, कुणाकडेही याबाबत आकडेवारी उपलब्ध नाही. दारूबंदी होण्यापूर्वी जिल्ह्यात एका वर्षाला 192 कोटी रूपयांची दारू प्यायली जायची. 2015 मध्ये दारूबंदी झाल्यानंतर हा आकडा 90 कोटींनी कमी झाला. हे दारूबंदीचे अंशिक यशच म्हणावे लागेल. त्यामुळे सरकारने कर गोळा करण्याच्या मोहात न पडता दारूबंदीसारखा चांगला निर्णय परतवून लावू नये, असे डॉक्टर बंग यांनी सांगितले.
गडचिरोली जिल्ह्यात 1993 पासून दारूबंदी आहे. तेथे दारूबंदीसाठी वापरण्यात आलेला 'मुक्तीपथ पॅटर्न' राज्यात सर्वत्र वापरला जावा. दारूबंदीच्या कडक अंमलबजावणीसाठी खास पंचवार्षिक योजनेची रचना करायला हवी, अशी मागणी डॉक्टर बंग यांनी केली.