पुणे - हरिनामाच्या जयघोषात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आज सायंकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले. यावेली लाखो भाविक हरिनामाच्या गजरात दंग झाले होते. यावेळी इंद्रायणीकाठ भक्तीरसात तल्लीन झाला होता.
मृदगांच्या आणि टाळाच्या जयघोषात ज्ञानेश्वर महारांच्या पालखीचे आज प्रस्थान झाले. यावेळी मानाच्या असणाऱ्या २२ दिंड्यांनी ज्ञानेश्वर महाराजांना सलामी दिली. या २२ दिंड्या गेल्या ४ तासांपासून हरिनामाच्या गजरात दंग होत्या.
ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान ज्ञानेश्वर महारांच्या पालखीचे प्रस्थान पाहण्यासाठी लाखो वारकऱ्यांनी गर्दी केली होती. जवळपास 250 किमी प्रवास पायी पार करत टाळ-मृदुंगाच्या नादात विठूनामाचा जयघोष करत वारकरी पंढरपूरला जात असतात. शेकडो वर्षाची परंपरा असलेली वारी महाराष्ट्राच्या श्रद्धेचे प्रतीक आहे.
मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, गोपाळपूर, इंद्रायणी नदी घाटाच्या दुतर्फा, चौकातील टेहळणी मनोरे आदी ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आळंदीत दर्शनबारी, आजोळघर येथेही पोलिसांचा खडा पहारा आहे. ग्रामीण आणि पुणे शहर पोलीस असा दुहेरी बंदोबस्त आळंदीत तैनात करण्यात आला आहे.