Diwali milan party in Pune : पुण्यात दिवाळी फराळ निमित्त भाजपा शिवसेना नेत्यात जुगलबंदी, मिसाळ यांना मंत्रिपद न मिळाल्याची खंत - सेना भाजपची जुनी युती पुन्हा व्हावी अशी अपेक्षा
Diwali milan party in Pune : आर्धी शिवसेना तर आलीच आहे बाकीच्यांनीही एकत्र यावं. दिवाळी फराळ निमित्त भाजप शिवसेना नेत्यात जुगलबंदी पुण्यात जुगलबंदी रंगली. यावेळी ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटीलही उपस्थित होते.
Published : Nov 14, 2023, 10:21 PM IST
पुणे : सध्या सर्वत्र दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी होत असून ठिकठिकाणी राजकीय नेत्यांकडून दिवाळी पहाट तसंच दिवाळी फराळ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे. पुण्यात आज झालेल्या दिवाळी फराळ कार्यक्रमात सर्वच राजकीय पक्षाच्या नेते मंडळींनी हजेरी लावली. यात पुन्हा एकदा भाजपा शिवसेना जुन्या युतीची चर्चा रंगली आणि भाजपा शिवसेनेच्या आजी माजी आमदारांकडून या विषयी चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळाली.
शिवसेनेचे नेते कोथरूडचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांच्या वतीने आज दिवाळी फराळचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विविध पक्षातील नेते मंडळी उपस्थित होते. यावेळी या दिवाळी फराळच्या कार्यक्रमाला मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ यांनी देखील हजेरी लावली. यावेळी माजी आमदार चंद्रकांत मोकाटे आणि भाजपाच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्यात चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळाली.
सेना भाजपची जुनी युती पुन्हा व्हावी अशी अपेक्षा - पुण्यातील आजी-माजी आमदारांनी सेना भाजपची जुनी युती पुन्हा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. सध्याच्या राजकारणावर बोलत असताना मोकाटे म्हणाले की, सध्या राज्याचं राजकारण ज्या पद्धतीने सुरू आहे ते पाहता कोण कुठं आहे हेच कळत नाहीये. आज या पक्षात तर उद्या त्या पक्षात पण मी ज्या पक्षाने मला मोठं केलं त्याच पक्षात आहे. उद्या भविष्यात भाजपा आणि सेना युती देखील होऊ शकते असं म्हणतात माधुरी मिसाळ म्हणाल्या की आर्धी शिवसेना तर आलीच आहे. बाकीच्यांनीही आमच्या बरोबर यावं. तसं म्हटलं तर भाजपा शिवसेनेची युती ही खूप जुनी आहे. पुन्हा एकत्र आल्यास आनंद होणार असल्याचं यावेळी मिसाळ यांनी सांगितलं.
यावेळी मोकाटे यांना आपण कोथरूडचे आमदार होण्यासाठी इच्छुक आहात का? असं विचारताच त्यांनी पक्षाने संधी दिली तर का नाही? असा प्रतिप्रश्न करत भविष्यात राज्याच्या राजकारणात काहीही होऊ शकतं, असं सांगत जुनी सेना भाजप पुन्हा एकत्र आल्यास आश्चर्य वाटणार नाही, असा नवा राजकीय बॉम्बच टाकून दिला. त्यावर भाजपाच्या पर्वतीच्या विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांनी अर्धी शिवसेना ऑलरेडी आमच्याकडे आलीय. उरलेल्या शिवसेनेनंही आमच्यासोबत यावं, असं म्हटलंय. एकूणच कायतर पुण्यातील सेना-भाजपाच्या या माजी- आजी आमदारांनी दिवाळी फराळाच्या निमित्ताने जुन्या आठवणी जागवत पूर्वीसारखीच सेना-भाजपा युती पुन्हा एकत्र यावी, अशी अप्रत्यक्ष इच्छाच प्रदर्शित केल्याचं बघायला मिळालं. दरम्यान माधुरी मिसाळ यांची मंत्रिपदाची संधी यावेळीही हुकल्याचं सांगत चंद्रकांत मोकाटे यांनी मिसाळ यांचं दु:ख हलकं करण्याचा प्रयत्न केला. पण आमच्या पक्षात शिस्तीला महत्व असल्याचं सांगत माधुरी मिसाळ यांनी मोकाटे यांच्या होला-हो प्रतिसाद देणं खुबीनं टाळलं.