मुंबईDiwali 2023 :राज्याला प्रदूषणापासून वाचवण्यासाठी आज मुंबई उच्च न्यायालयानं कडक आदेश दिले आहेत. रात्री 8 ते 10 या वेळेतच फटाके फोडवे, असे आदेश काढण्यात आले आहेत. तसंच 19 नोव्हेंबरपर्यंत मुंबईत बांधकाम 'डेब्रिज' नेण्यास पूर्ण बंदी असणार आहे. मुख्य न्यायमूर्ती डी के उपाध्याय, न्यायमूर्ती जी एस कुलकर्णी यांच्या खंडपीठानं 6 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्व महापालिका प्राधिकरणांच्या हद्दीत संध्याकाळी 7 ते 10 या वेळेत फटाके फोडण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर न्यायालयानं आज सुधारीत आदेश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 डिसेंबर रोजी होणार आहे.
दिवाळीत रात्री 8 ते 10 या वेळेतच फटाके फोडावेत, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाच्या निर्देशांचं पालन सर्वांनी करावं. तसंच कमीत कमी वायू तसंच ध्वनी प्रदूषण करणारे फटाके फोडावेत - डॉ. इकबाल सिंह चहल, आयुक्त BMC
रात्री 8 ते 10 या वेळेतच फटाके फोडा : मुंबईतील प्रदूषणाबाबत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या जनहित याचिकेवर आज खंडपीठांसमोर सुनावणी झाली. दरम्यान, खंडपीठानं फटाके फक्त रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत फोडले जावे असं आदेश सुनावले आहेत. उच्च न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत हा आदेश लागू राहतील.