महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गुडलकर चौकातील वंचितांची दिवाळी साजरी, अभ्यंगस्नानाचा अनोखा उपक्रम - दिवाली उत्सव

पदपथ-सिग्नलवर राहणाऱ्या मुलांसाठी आयोजित केलेल्या 'शाही अभ्यंगस्नाना'मुळे गुडलक चौकात पदपथावर राहणाऱ्या मुलांमुलींची शनिवारची सकाळ सुखद ठरली.

गुडलकर चौकातील वंचितांची दिवाळी साजरी

By

Published : Oct 26, 2019, 4:38 PM IST

पुणे -रांगोळ्यांचा थाट, मांडलेला पाट, सुगंधी तेल-उटण्यांचा सुवास, औक्षणाचे ताट, गोडाचा घास आणि त्यावर चढलेला नव्या कपड्यांचा साज. या साऱ्यांचा अविस्मरणीय अनुभव मिळाल्याने 'त्यांचा'ही दीपोत्सव आनंदमय झाला. शाही अभ्यंगस्नान आणि मनसोक्त फराळाचा आनंद घेताना ही मुले भारावून गेली. निमित्त होते, पदपथ-सिग्नलवर राहणाऱ्या मुलांसाठी आयोजित केलेल्या 'शाही अभ्यंगस्नाना'चे ! गुडलक चौकात झालेल्या या अनोख्या उपक्रमाने पदपथावर राहणाऱ्या मुलांमुलींची शनिवारची सकाळ सुखद ठरली.

हेही वाचा - दिवाळीनिमित्त बाजारात आले वाजवण्याचे नव्हे खाण्याचे फटाके!

खेळण्या-बागडण्याचे आणि शिकण्याचे वय असतानाही परिस्थितीने पोटाची खळगी भरण्यासाठी दररोजची सकाळ रोजगारासाठीच उजाडते. ना दसरा ना दिवाळी असे खडतर जीवन जगणाऱ्या या मुलांना आपल्याप्रमाणेच दिवाळीचा आनंद लुटता यावा, यासाठी आबा बागुल आणि मित्रपरिवाराने गेल्या आठ वर्षांपासून हा उपक्रम हाती घेतला आहे. शाही अभ्यंगस्नानानंतर या मुलांना नवे कपडे, फराळ आणि फटाके अशी मेजवानी मिळाल्याने मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला. तर या आनंदमय सोहळ्याने पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. कार्यकर्त्यांकडून परिसराची स्वछता करून येथे रांगोळ्यांचा सडा घालण्यात आला होता. त्यावर पाट मांडून प्रत्येक मुलाला उटणे लावून स्नान घालण्यात आले. त्यानंतर औक्षण करून, नवे कपडे आणि फराळ देण्यात आला.

हेही वाचा - "क्योर"चक्री वादळाचा सिंधुदुर्गला जबरदस्त तडाखा, जनजीवन विस्कळीत

ABOUT THE AUTHOR

...view details