पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्ष पायी वारी होऊ शकली नाही. दोन वर्षांनंतर आता उद्यापासून सुरू होणाऱ्या पालखी सोहळ्यासाठी प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी ( Palkhi Police Bandobast ) करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही आळंदी आणि देहू येथून संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा ( Sant Dnyaneshwar Palkhi Ceremony ) आणि संत तुकाराम महाराजांचा आषाढी वारी पालखी सोहळा ( Sant Tukaram Palkhi Ceremony ) पार पडणार आहे. पुणे जिल्ह्यातील दोन पालख्यांसोबत दोन मानाच्या पालख्या सासवडमधून निघत असतात. त्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने त्याची पूर्ण तयारी केलेली आहे, अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी दिली आहे.
असा असेल पोलीस बंदोबस्त - पालखी मार्गावर असणारे अडथळे दूर करणे असो, रस्त्याच्या साइडपट्ट्या भरणे असो, विसावा आणि मुक्कामाच्या ठिकाणची सोयी सुविधा यासर्व झालेल्या आहेत. त्याची नुकतीच चाचणी जिल्हा प्रधासनाकडून करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनातर्फे 1200 पोलीस कर्मचारी, आणि 120 पोलीस अधिकारी या पोलीस बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत. त्याचबरोबर 1000 हून अधिक होमगार्डस आणि दोन एसआरपीएफच्या कंपनी देखील यंदाच्या या वारीत बंदोबस्तसाठी असल्याचे देशमुख यांनी सांगितले आहे.पुणे ग्रामीणचा बंदोबस्त 1800 च्या आसपास असणार आहे. होमगार्ड धरून 2800 च्या आसपास बंदोबस्त असणार आहेत.