बारामती (पुणे) - दौंड तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्यावर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे १५० कोटींचे कर्ज अनुत्पादक झाले. त्यामुळे सिक्युरिटायझेशन ॲक्टनुसार कारखाना ताब्यात घेण्याची नोटीस बजावण्यात आल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार रमेश थोरात यांनी दिली आहे. कारखान्यात झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी साखर आयुक्तांकडे करण्यात आली. त्यानुसार अंमलबजावणी संचालनालयानेही (ईडी) राज्यातील अन्य कारखान्यांप्रमाणेच भाजपाचे आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वाखाली या कारखान्याची चौकशी करण्याची मागणी थोरात यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष दिवंगत माजी आमदार सुभाष कुल व उपाध्यक्ष म्हणून मी पदावर असताना ३८ कोटी रुपयांचे कर्ज आणि ७५ कोटी रुपयांची साखर कारखान्याकडे असताना कारखाना राहुल कुल यांच्या ताब्यात दिला. मागील तीन वर्ष कारखाना बंद अवस्थेत असून कारखाना चालू करण्याच्या मागण्या केल्या जात आहेत. कारखान्यातील मशनरी गंजलेल्या अवस्थेत असून नुसत्या थापा न मारता कारखाना चालू करण्याची राहुल कुल यांची जबाबदारी आहे. भाजपाचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारखान्याला ३६ कोटी रुपयांची मदत देऊनही कारखाना त्यानंतर बंदच आहे. ट्रॅक्टर, टोळीवाले ऊस वाहतूकदार यांच्याकडून विविध पाच बँकांमधून कर्ज उचल करण्यात आले असून आपली बँक सोडून आम्ही कोठूनही कर्ज उभारणी केलेली नसल्याचे हमीपत्र कारखान्याने दिल्याचा आरोप थोरात यांनी पत्रकार परिषदेत केला.
भीमा पाटस कारखान्याला जिल्हा बँकेची ताबा नोटीस
कारखान्यात झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी साखर आयुक्तांकडे करण्यात आली. त्यानुसार अंमलबजावणी संचालनालयानेही (ईडी) राज्यातील अन्य कारखान्यांप्रमाणेच भाजपाचे आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वाखाली या कारखान्याची चौकशी करण्याची मागणी थोरात यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
रमेश थोरात