पुणे - जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्यसेविकांना आज खेड पंचायत समितीच्या सभागृहात ६० टॅबचे जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, शरद बुट्टेपाटील यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. प्राथमिक आरोग्य उपकेंद्रस्तरावर जन्म, लसीकरणासंबंधी व असंसर्गजन्य रोगाची माहिती वेळेवर व अचूक भरण्यासाठी या टॅबचे वितरण करण्यात आले आहे.
राजगुरुनगरमध्ये जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेविकांना टॅबचे वाटप
प्राथमिक आरोग्य उपकेंद्रस्तरावर जन्म, लसीकरणासंबंधी व असंसर्गजन्य रोगाची माहिती वेळेवर व अचूक भरण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्यसेविकांना टॅबचे वाटप करण्यात आले. खेड पंचायत समितीच्या सभागृहात जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, शरद बुट्टेपाटील यांच्या हस्ते या टॅबचे वितरण करण्यात आले.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र येथील असंसर्गजन्य रोग निदान, जन्म तसेच लसीकरणाची माहिती अद्ययावत राहण्यासाठी व उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या गरोदर माता नोंदणी इत्यादीची माहिती भरण्यासाठी राज्य सरकारकडून प्रत्येक आरोग्यसेविकेला टॅब देण्यात आले आहेत. यामध्ये गरोदर माता नोंदणीपासून ते मुलाचे संपूर्ण लसीकरण योग्य पद्धतीने, वेळेवर व अचूक होण्याच्या दृष्टीने टॅबमध्ये लसीकरणासंबंधी सॉफ्टवेअर देण्यात आले आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रत्येक नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा वेळेत व न चुकता पोहोचावी आणि आरोग्य सेविकांना नवीन तंत्रज्ञानातून काम करता यावे, हाच उद्देश ठेवून राज्य सरकारच्या माध्यमातून टॅब देण्यात आले आहेत. त्यामुळे प्रत्येकाने या तंत्रज्ञानाचा योग्य वापर करुन जास्तीत जास्त लोकांपर्यंत आरोग्य सेवा देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन शरद बुट्टेपाटील यांनी केले.