पुणे- राज्यभरातून अनेक कुटुंब उदरनिर्वाहासाठी आळंदीत वास्तव्याला आहेत. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन लागू केल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे आळंदीतील दक्षता समितीच्या सदस्यांनी पुढाकार घेऊन या प्रत्येक कुटुंबांना धान्य उपलब्ध करुन दिले आहे.
गरजू लोकांना रेशन दुकानात धान्य वाटप... हेही वाचा-COVID-19 : भारताने गाठला चार हजार रुग्णांचा टप्पा; बळींची संख्याही शंभरहून अधिक..
आळंदी शहरात तीन रेशन दुकानांमधून धान्य वाटप केले जात आहे. सध्याच्या लॉकडाऊनमुळे संसर्ग टाळण्यासाठी गर्दी न करता रेशन दुकानांमध्ये धान्य वाटप केले जात आहे. यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करुन नागरिकांच्या धान्य मिळण्याबाबतच्या अडचणी सोडविण्यात येत आहेत. यासाठी आळंदी दक्षता समितीच्या संगीता फपाळ, वंदना सोनवणे यांनी मदत केंद्र तयार केली आहेत.
कोरोनावर मात करण्यासाठी नागरिकांनी गर्दी न करता रांगेत उभे राहून धान्य घ्यावे, असे आवाहन आळंदी नगरपरिषद, महसुल विभाग व आळंदी दक्षता समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान, देशातील 32 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र, हा आदेश झुगारुन लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. आवश्यकता भासल्याने संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. त्यानंतर 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी अखेर देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा आज 13 वा दिवस आहे.