पुणे -खेड शिरूर तालुक्यातील फळबागांवर रोगराई पसरत आहे. झाडाला लागलेल्या फळांचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. लॉकडाऊन, अवकाळी पाऊस आणि आता थंडीमुळे शेतपिकांसोबत फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. महागड्या औषधांची फवारणी करुनही काही फरक पडत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
बाजारात फळांना चांगला भाव मात्र, रोगामुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; शेतकरी चिंतेत महागड्या औषधांची फवारणी करुनही व्यर्थ-
जुन्नर आंबेगाव शिरूर खेड तालुक्यात पेरू, डाळिंब, द्राक्ष, बोर केळी अशा विविध पिकांच्या मोठ्या प्रमाणात फळबागा आहेत. या फळबागांवर सध्या वातावरणातील बदलामुळे फळकुज, कुजवा, मावा, डाग ,थ्रिप्स यासारखे विविध रोग मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे झाडाला लागलेली फळे गळून पडत आहेत. या रोगावर मात करण्यासाठी शेतकरी महागड्या औषधांची फवारणी करत आहे. मात्र, वातावरणातील बदलामुळे रोगराई संपतच नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
कुजवा, मावा व डाग या रोगांचा प्रादुर्भाव...
जुन्नर तालुक्यात पेरूच्या मोठ्या प्रमाणात फळबागा आहेत. या बागांवर कुजवा, मावा व डाग पडणे अशा रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे काढणीला आलेली फळे पुर्णपणे खराब होत आहेत. त्यामुळे यंदा उत्पादन चांगले मिळूनही होत असलेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे.
पेरुला चांगले दर मात्र, रोगामुळे ग्राहकांची पाठ
सध्या बाजारात पेरूला मोठ्या प्रमाणात मागणी आहे बाजारात चांगले दरही मिळत असताना पेरूवर पसरलेल्या रोगराईमुळे ग्राहक पेरूकडे पाठ फिरवत आहे. त्यामुळे मोठ्या मेहनतीतून उभारलेली फळबाग आणि त्यातून मिळणारे उत्पादन चांगले असले तरी सध्याच्या रोगराईमुळे पेरूची मागणी घटली आहे. परिणामी शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे.
हेही वाचा-पुणे : सारसबागेसमोर डंपरखाली चिरडल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू
हेही वाचा-'सुपर संभाजीनगर'वरून औरंगाबादेत रंगले राजकारण