पुणे - कोरोना झपाट्याने वाढत असताना सध्या चार हजारांहून अधिक कोरोना रुग्णांना प्लाझ्माची गरज भासत आहे. मात्र, प्रत्यक्षात फक्त 200 रुग्णांना पुरेल इतकाच साठा उपलब्ध असल्याची बाब समोर आली आहे. काही कोरोनामुक्त दाते किचकट प्रक्रियेमुळे प्लाझ्मादानासाठी पुढे येत नाहीत, तर काही दात्याकडून थेट पैशांची मागणी होत आहे. त्यामुळे 'कुणी प्लाझ्मा देतं का प्लाझ्मा? अशी म्हणण्याची वेळ पुणेकरांवर आली आहे.
पुणेकर कुठल्याच बाबतीत मागे नसतात याचा प्रत्यय वेळोवेळी पाहायला मिळतो. मात्र, सध्या गरज भासत असलेल्या प्लाझ्माच्या बाबतीत पुणेकर मात्र चार पावले मागेच राहिले आहे. शहरात कोरोनाबधिताची संख्या सव्वा लाखाच्या घरात पोहोचली आहे. त्यात कोरोनामुक्त झालेल्याची संख्या 1 लाखांच्या वर गेली आहे. दुसरीकडे शहरात प्लाझ्माची मागणी गेल्या काही दिवसांपासून वाढली आहे. त्या तुलनेत उपलब्धता कमी आहे. कोरोनाचे रुग्ण बरे झाल्यानंतर प्लाझ्मादान करण्यासाठी फारसे कोणी पुढे येत नाही आहे. शहराची कोरोनाच्या बाबतीत परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.
पुणे शहरात दररोज 1 हजार 500 ते 2 हजार कोरोना रुग्ण सापडत आहेत. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे रोजच्या आकडेवारीनुसार रुग्ण बरेही होत आहेत. पुणे शहरात 961 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 520 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत 3 हजार 373 रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. शहराची अशी परिस्थिती असताना कोरोनाने आत्तापर्यंत 1 लाख 21 हजार 176 जणांनी कोरोनावर मात केली आहे. इतक्या जणांनी कोरोनावर मात केली असताना दाते प्लाझ्मासाठी पुढे येत नाही आहेत. शहरात दिवसभरातून फक्त 10 ते 12 दाते पुढे येत आहेत. काही रक्तपिढ्या कोरोनामुक्त दात्यांना फोन करतात तेव्हा त्या दात्यांकडून पैशांची मागणी होत आहे.