राजगुरुनगर (पुणे)- भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर क्रांतिकारक हुतात्मा राजगुरू यांच्या राजगुरुनगर येथील जन्मस्थळी दिपावली निमित्ताने जाणीव परिवार या संघटनेच्यावतीने 'एक दिवा हुतात्म्यांसाठी' हा उपक्रम साजरा करण्यात आला. यावेळी राजगुरू वाडा हजारो दिव्यांनी उजळून निघाला होता.
राजगुरुनगर येथील जाणीव परिवार ग्रुपच्या माध्यमातून गेल्या सहा वर्षांपासून हुतात्मा राजगुरू यांचे जन्मस्थळ असलेल्या राष्ट्रीय स्मारकात दिपावली निमित्ताने दिपोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी राष्ट्रीय स्मारकाजवळील मैेदानात या दिपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील नागरिक विशेषतः तरुण तरुणी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यंदा दिवाळीवर कोरोनाचे संकट असल्याने हा सण सर्वत्र साधेपणाने साजरा करण्यात येत आहे. मात्र, आपल्या गावातील हुतात्म्याने देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्या क्रांतीकारकाचे स्मरण म्हणून राजगुरुनगर येथील राजगुरु वाड्यावर दिपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.