पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन जुलै रोजी बंड झाले होते. अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडत शिवसेना, भाजप युतीच्या सरकारमध्ये सहभाग घेतला. शरद पवार यांचे विश्वासू समजले जाणारे दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांची साथ सोडत अजित पवार गटात सहभागी झाले होते. शनिवारी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यटच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील हे एकत्रित दिसले. आम्ही शरद पवार यांना सोडून गेलेलो नाहीत, ते आमचे कालही नेते होते, उद्याही राहतील, अशी प्रतिक्रिया वळसे पाटील यांनी दिली आहे.
शरद पवार यांना सोडून गेलेलो नाही :आम्ही शरद पवार यांना सोडून गेलेलो नाहीत. शरद पवार हे आमचे कालही नेते होते आणि उद्याही राहतील, अशी प्रतिक्रिया दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी दिली आहे. राष्ट्रीय साखर संघाच्यावतीने एक डेलिगेशन ब्राझीलला गेले होते. तिथे नवीन टेक्नॉलॉजी बघितल्यावर इथे कशा पद्धतीने ती घेता येईल याबाबत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये काही तज्ञ लोकांनी एकत्र येत मार्गदर्शन केले आहे. आजच्या या बैठकीला अध्यक्ष शरद पवार, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, तसेच राजेश टोपे उपस्थित होते.
मला पवारांनी थांबवले हे खरे आहे :राष्ट्रवादीच्या फुटीनंतर दिलीप वळसे पाटील हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती होती. मात्र, स्वतः शरद पवार यांनी वळसे पाटील यांना राजीनामा देण्यापासून थांबवले, तर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे काम करण्याचे देखील सांगितले. या चर्चांना स्वतः दिलीप वळसे पाटील यांनी दुजोरा दिला आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर दिलीप वळसे पाटील हे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, हा वयक्तिक प्रश्न आहे. पण मला काम करायला सांगितले हे खरे आहे.
आज कोणतीही बैठक नव्हती : शनिवारी अजित पवारांनी व्हिएसआयला येणे टाळले का? यावर दिलीप वळसे पाटील म्हणाले की, कोणतीही बैठक नव्हती. आज फक्त परिसंवाद होता, यासाठी परदेशातील तज्ञ आले होते. राज्यातील साखर कारखानदार आले होते. यावेळी प्रश्न उत्तरेही झाली. आज शासकीय आणि हा असे दोन कार्यक्रम होते. त्यामुळे तिकडे अजित पवार गेले आणि येथे मी आलो, असे यावेळी पाटील म्हणाले.