पुणे -राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटलांमुळेच खेड तालुक्यात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटलांनी केला आहे. भर लॉकडाऊनमध्ये पुण्यातील डोणजे येथील रिसॉर्ट सुरू ठेवण्यात आले. या रिसॉर्टमध्ये शिवसेनेचे 6, राष्ट्रवादीच्या 4 तर भाजपाच्या एका अशा 11 पंचयात समिती सदस्य आणि त्यांच्या कुटुंबीयांचे वास्तव्य होते. यातून आणखी वाद वाढत गेला, याला दिलीप मोहिते हे जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर यांच्या विरुद्ध शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 11 सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. त्यावर 31 तारखेला प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांच्यासमोर मतदान होणार आहे. दरम्यान त्यापूर्वी पुण्यातील डोणजे येथील एका खासगी रिसॉर्टवर हे 11सदस्य सहलीसाठी गेले होते. तेव्हा त्यांच्यावर सभापती भगवान पोखरकर आणि इतर काही जणांनी हल्ला केला होता. ही सर्व घटना रिसॉर्टच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. त्यानुसार हवेली पोलीस ठाण्यात प्रसाद काळे यांच्या फिर्यादीवरुन विद्यमान सभापती भगवान पोखरकर, केशव अरगडे, जालिंदर पोखरकर, यांच्यासह 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आढाळराव पाटील बोतल होते.