पुणे Dhirendra Shastri : जगदीश मुळीक फाउंडेशनतर्फे बागेश्वर महाराज सरकार यांची तीन श्री हनुमान कथा व महादिव्य दरबारचं आयोजन पुण्यात करण्यात आलं आहे. आज याचं उद्घाटन होणार आहे. उद्घाटनापूर्वी बागेश्वर महाराज यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. (Dhirendra Shastri On Maratha Reservation) यावेळी बागेश्वर महाराज म्हणाले की, जी सांस्कृतिक राजधानी म्हटली जाते त्या पुण्यनगरीत तीन दिवस श्री हनुमान कथा आयोजित करण्यात आली आहे. कार्यक्रमात मी भारतीय संस्कृती आणि सनातन याबाबत जागृती करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि सनातनच्या एकतेसाठी प्रयत्न करणार आहे. तसेच मी काहीही वेगळं करत नाहीये. जी आपली संस्कृती आहे तिची पुनर्स्थापना व्हावी आणि सर्वजण कसे एकत्र येतील यासाठी प्रयत्न करणार आहे. (Dhirendra Shastri on Hindu Rashtra)
तर तुकाराम महाराजांच्या समाधीस्थळी जाणार:मध्यंतरी बागेश्वर महाराज यांनी संत तुकाराम महाराजांविषयी जे विधान केलं होतं त्यावरून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. याबाबत त्यांना विचारलं असता ते म्हणाले की, मी संतांना नेहमी भगवान सारखं मानत असतो आणि त्यांच्या प्रती नेहमी मला आदर असतो. कोणीही संतांचा विरोध करू शकत नाही. संत तुकाराम महाराज यांच्या बाबतीत एका पुस्तकात जो लेख मिळाला होता त्यात आपापल्या बोलण्याच्या शैलीप्रमाणे मी देखील बुंदेलखंडी शैलीत सांगितलं आणि यामुळे काहीजण विरोध करू लागले; पण मी याबाबत तेव्हाही माफी मागितली होती आणि आताही माफी मागत आहे. मला जसा वेळ मिळेल तसा मी त्यांच्या देहू येथील समाधी स्थळी देखील जाणार असल्याचं यावेळी बागेश्वर महाराज यांनी सांगितलं.
त्यांचं वर्णन शास्त्रात नाही:साईबाबा यांच्या बाबतीत विचारलं असता ते म्हणाले की, त्यांच्या बाबतीत मी कोणतीही टिप्पणी केलेली नाही. लोक आपापल्या पद्धतीनं अर्थ काढत असतात. मला एकाने प्रश्न केला होता की, ते भगवान आहे का? तर मी त्यांना असं म्हटलं होतं की, आमच्या धर्मग्रंथात त्यांचा अवतार नाही. संत हे भगवानच्या समान असतात. जो तो आपल्या आस्थेनं गुरूला भगवान मानू शकतो. साई बाबांना जे कोणी भगवान मानत असेल ती त्यांची आस्था आहे; पण शास्त्रात आम्हाला त्यांचं वर्णन कुठेही मिळालेलं नाही.