पोलीस महासंचालक रजनिश सेठ बोलताना पुणे :राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्या हस्ते ३३ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा-२०२३ चे राज्य राखीव पोलीस बल क्र.२ मैदान वानवडी येथे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राज्याचे अपर पोलीस महासंचालक अनुप कुमार सिंह, कारागृह व सुधारसेवा अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता, राज्य राखीव पोलीस दलाचे अपर पोलीस महासंचालक चिरंजीवी प्रसाद, होमगार्डचे महासमादेशक भूषणकुमार उपाध्याय, प्रशिक्षण विभागाचे पोलीस महासंचालक संजय कुमार,पोलीस आयुक्त रितेश कुमार, विनय कुमार चौबे आदी उपस्थित होते.
पोलिस क्रीडा स्पर्धा : पुण्याच्या सांस्कृतिक आणि क्रीडा नगरीत पोलीस क्रीडा स्पर्धा-२०२३ चे आयोजन होत असल्याचबाबत आनंद व्यक्त करून पोलिस महासंचालक रजनीश सेठ म्हणाले, पोलीस दलात क्रीडा संस्कृती विकसित होऊन खेळाडूंमधील एकोपा वाढीस लागेल. या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील एकूण १३ संघ सहभागी होत असून १८ क्रीडाप्रकारांचा स्पर्धेत समावेश आहे. राज्यातून २ हजार ५९० खेळाडू सहभागी झाले आहेत.
उत्तम कामगिरीची अपेक्षा :पोलीस दलातील खेळाडूंना दर्जेदार क्रीडा साहित्य, खेळ सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या स्पर्धेतील सहभागामुळे खेळाडूंचा दर्जा उंचावून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पुण्यात पोलीस दलातील खेळाडूंसाठी पोलीस क्रीडा संकुल उभारण्याकरिता शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे, असेही सेठ म्हणाले.
स्पर्धेचा पोलिस दलाला फायदा : अपर पोलीस महासंचालक अनुप कुमार सिंह म्हणाले की, या क्रीडा स्पर्धेत सहभागी संघामध्ये अतिशय चुरशीच्या लढती होणार आहेत. खेळाडूंनी खिलाडूवृत्तीने खेळावे. या स्पर्धेच्या माध्यमातून नवनवीन खेळाडू तयार होतील त्याचा फायदा खेळाडू सोबतच राज्य पोलीस दलाला देखील होणार आहे. राज्य पोलीस दलातील खेळाडूंनी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळांच्या स्पर्धेत सहभागी होऊन उत्तम कामगिरी करावी, असेही ते म्हणाले.
अधिकाऱ्यांच्या बदल्या लवकरच : यावेळी पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्ज्वलित करण्यात आली. स्पर्धेत सहभागी सर्व १३ संघांनी शानदार संचलन केले. संचलनप्रमुख पोलीस उपनिरीक्षक किशोर कुमार टेंभुर्णे यांनी खेळाडूंना शपथ दिली. प्रारंभी पोलीस दलातील श्वान पथकाने सादर केलेल्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांना तसेच विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मर्दानी खेळांच्या सादरीकरणाला उपस्थित प्रेक्षकांनी भरभरुन दाद दिली. पोलिस अधीक्षक, उपअधीक्षक बदल्या लवकरच होतील. गृहमंत्रालय त्यावर काम करत आहे. राज्यातील लॉ आणि ऑर्डर साठी महाराष्ट्र पोलिस सक्षम आहे. २०२२ उत्तम वर्ष होते. नक्षल विरोधी देखील आम्ही खूप चांगले काम करतो आहेत, असे देखील यावेळी सेठ म्हणाले.
कोयता गॅंगसाठी विशेष पथक : शहरातील कोयता गँग बाबत विचारलं असता सेठ म्हणाले की पुण्याचे पोलिस आयुक्त यांनी दखल घेतली आहे.कोयता गँग विरोधात एक नवीन पथक तयार करण्यात येणार आहे. हे गुन्हे कसे कमी होतील यासाठी प्रयत्नशील आहोत, असे देखील यावेळी सेठ म्हणाले.