पुणे - राजकारणात सत्ता येते आणि जाते. पण सत्ता असो किंवा नसो, प्रत्येकाने सन्मार्गाने जायचे आहे आणि त्याचे टॉनिक वारकरी सांप्रदायात आहे. त्यासाठी मी इथं आलो आहे, त्यामुळे आज इथून टॉनिग घेऊन वाटचाल करायची आणि त्यातून लोकांचा आशिर्वाद असला की आपण येतोच.. येतोच.. येतोच.. असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यामुळे मी पुन्हा येईन नंतर आत्ता आपण येतोच...येतोच..येतोच या त्यांच्या वक्तव्याची चर्चा झाली.
आळंदी येथे आयोजीत जोग महाराजांच्या पुण्यतिथी शताब्दी सोहळ्याच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते. या कार्यक्रमादरम्यान फडणवीस यांनी वारकरी सांप्रदायाचे महत्व अधोरेखित केले. आमचे सरकार संकुचीत विचार करणारे नाही. केंद्र, राज्य यांच्यात मतभेद न करता आपलं एक कुटूंब टिकलं पाहिजे. त्यातून विश्वाच्या कल्याणाचा विचार आम्ही करत असल्याचे फडणवीस म्हणाले. सेक्युलर शब्दाची व्याख्या काय? यावर अनेक मतभेद असू शकतात, मात्र, सर्वांना बरोबर घेऊन सर्वांना सामावून घेणारा वारकरी सांप्रदाय असल्याचे ते म्हणाले.