पुणे - महाराष्ट्र पोलिसांवर आमचा पूर्ण विश्वास आहे. मी पाच वर्ष पोलिसांसोबत काम केलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांची क्षमता काय आहे? याची मला पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलीस आणि बिहार पोलीस अशी तुलनाच होऊ शकत नाही. महाराष्ट्राचे पोलीस सर्वोत्तम आहेत, हे पहिल्या दिवसांपासून सांगत असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मात्र, अनेकवेळा पोलीस राजकीय दडपणाखाली काम करतात. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात पोलिसांनी राजकीय दडपणाखाली काम करू नये, अशी आमची अपेक्षा आहे. या प्रकरणात जी काही परिस्थिती निर्माण झाली त्यातून हे प्रकरण सीबीआयकडे गेले पाहिजे अशी जनभावना तयार झाली आहे. म्हणूनच हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले असून या प्रकरणात आता न्यायालयच योग्य तो निर्णय घेईल, असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यात राष्ट्रीय जनकल्याण समिती आणि महाराष्ट्र पत्रकार संघ यांच्यातर्फे सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन करण्यात आले, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
राजकारण करण्यापेक्षा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात आम्हाला अधिक स्वारस्व आहे. महाविकासआघाडीने अगोदर त्यांचे सरकार नीट चालवावे. सरकार अंतर्गतचं इतकी भांडणे आहेत की, सरकारमध्ये काय चालले आहे हे कुणाच्याच लक्षात येत नाही. विशेषतः प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भात जे काही सुरू आहे ते अनाकलनीय आहे, असेही फडणवीस म्हणाले.