पुणेSushma Andhare On Devendra Fadnavis :ललित पाटील प्रकरणी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून गांभीर्यानं विचार करण्याची गरज असल्याचं शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी वक्तव्य केलं आहे. त्या आज पुण्यात बोलत होत्या. या संदर्भात दोन दिवसांपूर्वी अधिवेशनात तारांकित प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोटी माहिती दिली, ती दिशाभूल करणारी आहे, अशी टीका देखील अंधारे यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस शांतपणे खोटे बोलतात : फडणवीसांनी बोलताना ड्रग्जवर भाष्य केलं. नाशिकमध्ये ललित पाटील कोणाच्या आशीर्वादानं रॅकेट चालवत होता, हे समोर आलं पाहिजे. ललित पाटील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत होता, असं त्यांनी बोलताना सांगितलं. मात्र, ते खोटं बोलत आहेत. फोटोत ललित पाटील दादा भुसे यांच्यासोबत दिसत आहेत. म्हणजे दादा भुसे ललित पाटीलला तिथं घेऊन आले, असं दिसतंय. यावर देवेंद्र फडणवीस अत्यंत शांतपणे खोटं बोलत असल्याची टीका अंधारे यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस गेल्या अधिवेशनात अनिल जयसिंघानी यांच्याबद्दल गोलमटोल बोलले होते. ललित पाटील प्रकरणातही तेच होत आहे. ससूनचे संजीव ठाकूर यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती फडणवीस यांनी दिली, ही माहिती चुकीची आहे. कारण MAT प्रकरणामुळं संजीव ठाकूर यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. या सरकारनं केलेल्या कारवाईमुळं त्यांनी खुर्ची सोडलेली नाही, असं देखील अंधारे म्हणाल्या.