पुणे - सात वर्षात नरेंद्र मोदी सरकारकडे पूर्ण बहूमत असतानादेखील त्यांचा कारभार हा नियोजन शून्य असल्याची टीक माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. केंद्रातील मोदी सरकारला सात वर्ष पूर्ण झाले आहे. त्यानिमित्त देशभरात काॅंग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. यासंदर्भात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुणे शहर काॅंग्रेस कमिटी कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी देशात कोरोनाचा उद्रेक तसेच मोदी सरकारची सात वर्षांची कामगिरी यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी हल्लाबोल करत टीका केली.
देशात कोरोना उद्रेकाला मोदी जबाबदार -
अमेरिकेत झालेल्या सर्वेक्षणानुसार कोरोना परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकार अकार्यक्षम ठरले आहे. राहुल गांधी यांनी कोरोनाबाबत वेळोवेळी उपाययोजना सांगूनही मोदी सरकारने योग्य ती पाऊले न उचल्याने देशात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळाला असल्याचेही चव्हाण यांनी म्हटले. टाळेबंदी करताना ही कोणत्याही प्रकारचे नियोजन न केल्याने देशात पहिल्या लाटेत 12 कोटी लोकांचा रोजगार गेला. 1 लाख टन ऑक्सिजन निर्मिती केल्याचे सांगितले असताना देखील दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची कमतरता कशी भासली याचे उत्तर मोदी सरकारने द्यावे. फक्त ताली, थाळी वाजून काहीही झाले नाही, असेही त्यांनी म्हटले.
लसीकरणात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार -
देशात लसीकरणाचे योग्य नियोजन न केल्याने देशात लसीकरणाचा फज्जा उडाला आहे. देशात आतापर्यंत सर्वच पंतप्रधानांनी सर्वप्रथम देशवासियांना प्राधान्य दिले आहे. पण मोदी सरकारने हे न करता लसी विविध देशात पाठवल्या. लसीकरणाबाबत एकदम 200 कोटी लसीची ऑडर का केली नाही. ती जर केले असती तर आज लसीच्या किमती कमी झाल्या असत्या. लसीचे योग्य नियोजन न केल्याने लसीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे आणि याची चौकशी व्हावी, तसेच केंद्राने सर्व लसी स्वतःहा खरेदी करून याच योग्य नियोजन करायला हवे, असेही ते म्हणाले.